अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विविध श्रेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याचा प्रभाव शेअर बाजारावरदेखील दिसून आला आहे. आज शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. आज सेन्सेक्स ४०८.९२ अकांनी खाली आला असून निफ्टी १६२.९५ अंकांनी खाली आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्येही घसरण बघायला मिळाली असून त्यांचे शेअर्सही १० टक्क्यांनी खाली आले आहेत.
काल अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजारात तेजी बघायला मिळाली होती. यावेळी सेन्सेक्सने ६० हजारांचा टप्पा ओलांडला होता, तर निफ्टीनेदेखील १७ हजार ८०० चा टप्पा पार केला होता. मात्र संपूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यावर या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणि निफ्टीमध्ये घसरणीला सुरुवात झाली. काल दिवसाअखेर सेन्सेक्समध्ये १६२ वाढ होत ५९ हजार ७१२ वर बंद झाला, तर निफ्टी हा ४६ अंकांनी घसरत १७ हजार ६१६ वर स्थिरावला होता.
हेही वाचा – Adani FPO: गौतम अदाणींनी सांगितलं एफपीओ गुंडाळण्यामागचं कारण; म्हणाले, “काल बाजारपेठेत…!”
दरम्यान, आज अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांची घसरण बघायला मिळाली.