scorecardresearch

Adani FPO: गौतम अदाणींनी सांगितलं एफपीओ गुंडाळण्यामागचं कारण; म्हणाले, “काल बाजारपेठेत…!”

अदाणी समूहाने FPO का गुंडाळला?

gautam adani fpo called back
अदाणी समूहाने FPO का गुंडाळला? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Adani FPO: भारतातील अब्जाधीश आणि अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी कंपनीचा महत्त्वाकांक्षी FPO बाजारातून गुंडाळण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ज्यांनी या एफपीओची खरेदी केली, त्या गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे. एफपीओ खरेदीचे सर्व पैसे गुंतवणूकारांना परत करणार असल्याचं अदाणी समूहाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, नेमकं अदाणींनी असं का केलं? यावर शेअर बाजारात चर्चा सुरू असताना अदाणींनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यासंदर्भातील अदाणींच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे.

अदाणी समूहाच्या हवाल्याने हा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतम अदाणी स्वत: या निर्णयाविषयी माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीमध्ये अदाणींनी हा निर्णय का घेतला, कुणी घेतला आणि या निर्णयानंतर पुढे अदाणी समूहाची वाटचाल कशी असणार आहे? याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

..म्हणून FPO गुंडाळण्याचा निर्णय घेतला!

अदाणींनी बुधवारी अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हा निर्णय कंपनीच्या बोर्डाने घेतल्याचं सांगितलं आहे. “मित्रहो, आमचे एफपीओ पूर्णपणे विक्री झाल्यानंतर काल आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण काल शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता पाहाता आमच्या बोर्डाला असं वाटलं की या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवणं नैतिकतेला धरून राहणार नाही”, असं अदाणी या व्हिडीओमध्ये म्हणाले.

आणखी वाचा – गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय

“माझ्यासाठी गुंतवणूकदारांचं हित सर्वात महत्त्वाचं”

दरम्यान, आपल्यासाठी गुंतवणूकदारांचं हित सर्वात महत्त्वाचं असल्याचं अदाणींनी व्हिडीओत म्हटलं आहे. “गेल्या ४० वर्षांच्या आमच्या प्रवासात मला सर्वच भागधारकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. विशेषत: गुंतवणूकदारांनी मला पाठिंबा दिलाय. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आहे. माझ्या यशासाठी तेच कारणीभूत आहेत.माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचं हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. इतर सर्वकाही दुय्यम आहे. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे”, असं अदाणी म्हणाले.

आणखी वाचा – ‘अदानी’ने ‘एफपीओ’ गुंडाळला; गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय

पुढे काय?

दरम्यान, सध्या शेअर बाजारात होत असलेल्या उलथापालथी आणि अदाणी समूहाच्या शेअर्सचा उलटा प्रवास यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत असून कंपनीचं पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर अदाणींनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा निर्णय आमच्या सध्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम करणार नाही. आम्ही यापुढेही प्रकल्पांवर वेळेत अंमलबजावणी सुरू करून ते पूर्ण करत राहणार आहोत. आमच्या कंपनीचे मूलभूत तत्व फार मजबूत आहेत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य कायम आहे. कर्ज चुकवण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे”, असं अदाणी म्हणाले.

“आम्ही यापुढेही दीर्घकाळ संपत्ती तयार करणं आणि विकासावर लक्ष केंद्रीत करत राहणार आहोत. एकदा शेअर बाजार स्थिर झाला की आम्ही आमच्या निर्णयांचा पुनर्विचार करू. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदार पद्धतीने संपत्ती बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील”, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा – अदाणी समूहाचा गैरव्यवहार, बीबीसी वृत्तपट, बेरोजगारी यावर चर्चेसाठी विरोधक आग्रही; सरकारचे मात्र एका वाक्यात उत्तर

“मी माझ्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना धन्यवाद देतो की त्यांनी या एफपीओला उत्तम प्रतिसाद दिला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातल्या अस्थिरतेनंतरही तुमचा अदानी समूहावरील विश्वास आम्हाला धीर देणारा आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्हाला भविष्यातही असाच पाठिंबा मिळत राहील. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद”, असं गौतम अदाणींनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 09:02 IST
ताज्या बातम्या