मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सलग आठ सत्रातील घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी १ टक्क्यांनी वधारले. मुख्यतः बँकिंग, वित्त, वाहन निर्माण (ऑटो) आणि औषध निर्मिती (फार्मा) क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सने ७१५ अंशांची मुसंडी मारली.
रिझर्व्ह बँकेने रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आणि आगामी पतधोरण बैठकीत व्याजदर कपातीस वाव असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम भांडवली बाजारावर दिसून आले. दिवसअखेर सेन्सेक्स ७१५.७० अंशांनी वधारून ८०,९८३.३१ पातळीवर स्थिरावला, तर दुसरीकडे निफ्टी २२५.२० अंशांनी वधारला आणि २४,८३६.३० पातळीवर पोहोचला.
शेअर बाजार वाढीची मुख्य कारणे काय?
१) बँक शेअरमध्ये खरेदी: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण घोषणेनंतर बँक निफ्टी आणि वित्तीय सेवा निर्देशांकात मोठी खरेदी दिसून आली. विश्लेषकांच्या मते, बँकिंग संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांनी बॅकांचे समभाग खरेदीस प्राधान्य दिले. शेअर तारण कर्ज मर्यादा आधीच्या २० लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने कर्ज देण्यासंबंधित नियमांमध्ये सुधारणा केल्याने बँक निफ्टी ७०० अंकांनी वधारला, तर फिन निफ्टी १.२ टक्क्यांनी तेजीत होता.
२) जागतिक संकेत: मजबूत जागतिक संकेतांनीही तेजीला हातभार लावला. दक्षिण कोरियाचा कोस्पी मंगळवारी वधारला होता, तर अमेरिकी भांडवली बाजार सकारात्मक पातळीवर स्थिरावले.
३) खनिज तेल घसरण: जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर १.४ टक्क्यांनी घसरून ६७.०२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, ज्यामुळे महागाईच्या आघाडीवरील चिंता कमी झाल्या आणि शेअर बाजाराला आधार मिळाला.
४) रुपया सावरला: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी वधारला आणि ८८.७५ वर पोहोचला, ज्यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराला आणखी बळ मिळाले.
५) इंडिया व्हिक्स घसरला: गुंतवणूकदारांच्या भावना प्रतिबिंबित करणारा अस्थिरता निर्देशांक ७ टक्क्यांनी घसरून १०.२९ वर पोहोचला. भीती निर्देशांकातील घसरण ही सामान्यतः बाजारातील अनिश्चिततेचे लक्षण म्हणून पाहिली जाते, जी गुंतवणूकदारांना जोखीम घेण्यास प्रोत्साहन देते.
६) दर कपातीसाठी वाव : सध्याच्या समष्टिगत आर्थिक परिस्थिती आणि वाढीला चालना देण्यासाठी धोरणात्मक जागा खुली ठेवली असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी बैठकीत व्याजदर कपातीस वाव आहे. चालू आर्थिक वर्षासाठी चौथ्या द्वैमासिक पतविषयक धोरणाची घोषणा करताना, रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्या बैठकीत रेपो दर ५.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने तटस्थ भूमिका राखली आहे.
७) ऑटो शेअर्समध्ये वाढ: जीएसटी कपात आणि सणासुदीमुळे प्रवासी वाहनांची मागणी वाढली आहे. बजाज ऑटोने सप्टेंबरमध्ये निर्यातीसह एकूण विक्रीत ९ टक्के वाढ नोंदवली आहे, जी ५,१०,५०४ दुचाकींवर पोहोचली आहे.