मुंबई : दळलेले आणि संपूर्ण मसाले, बियाणे, धान्ये आणि डाळी आणि कणिक (आटा) यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीत कार्यरत असलेल्या श्रीजी ग्लोबल एफएमसीजी लिमिटेडची येत्या ४ नोव्हेंबरपासून प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू होत आहे. या माध्यमातून ८५ कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस असून, आयपीओ-पश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
श्रीजी ग्लोबल ही कंपनी ‘शेटजी’ या नाममुद्रेअंतर्गत देशातील २२ राज्ये आणि २५ निर्यात बाजारपेठांमध्ये तिच्या विविध उत्पादनांसह कार्यरत आहे. कंपनीची गुजरातमधील राजकोटजवळ स्वयंचलित मसाला आणि बहु-भुसार कणिक उत्पादन प्रकल्प, मसाले व धान्य साठवणुकीची ५,००० मेट्रिक टन क्षमतेची शीतगृह (कोल्ड स्टोरेज) सुविधा आहे. तसेच नवोपक्रम आणि गुणवत्ता यावर भर देत, ग्लूटेन-मुक्त, उच्च फायबर असलेले कणिक आणि गरम मसाले, पाव भाजी मसाला, सांबार मसाला यासारखी तयार मसाला मिश्रणे आदी नवीन उत्पादने नजीकच्या काळात बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे, असे श्रीजी ग्लोबल एफएमसीजी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र कक्कड म्हणाले.
कंपनीने आयपीओसाठी प्रत्येकी १२० रु ते १२५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. ही समभाग विक्री ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होत आहे. यातून मिळणारा निधी प्रकल्पाच्या विस्तारासाठी भांडवली खर्च, यंत्रसामग्री आणि शीतगृहावरील भांडवली खर्च तसेच छतावरील सौर वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी केला जाईल.
आयपीओमधून मिळणारा निधी कंपनीच्या उत्पादन कार्यक्षमतेत, ऊर्जा शाश्वततेत आणि पुरवठा साखळी क्षमतांमध्ये वाढ करेल. ज्यामुळे व्यवसायाचा व्याप वाढवता येईल आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्पादन भांडाराला विस्तृत करता येईल, असे कक्कड यांनी नमूद केले. कंपनीची निर्यात सध्या संयुक्त अरब अमिरात आणि आखातात सर्वाधिक आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, कंपनीचे उत्पन्न ६४८.९२ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १२.१५ कोटी रुपये इतका होता. कंपनीची बहुतांश निर्यात सध्या संयुक्त अरब अमिराती आणि आखाती देशांमध्ये आहे.
