मुंबई : जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भांडवली बाजारात अस्थिरता असूनही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला आहे. सरलेल्या ऑगस्टमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून २८,२६५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ अर्थात ॲम्फीने बुधवारी दिली.
मासिक आधारावर ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक यंदा किंचित घटली आहे. जुलै महिन्यात या माध्यमातून २८,४६४ कोटी रुपये आले होते. एकूणच, इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडांनी ऑगस्टमध्ये ३३,४३० कोटींचा निव्वळ प्रवाह नोंदवला. ज्यामुळे सलग ५४ व्या महिन्यात त्यांची सकारात्मक मालिका कायम राखली आहे. आधीच्या जुलै महिन्यांत इक्विटी फंडांमध्ये ४२,७०२ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. मुख्यतः नवीन फंड योजनांमध्ये (एनएफओ) घट झाल्यामुळे ऑगस्टमध्ये इक्विटी फंडांमधील गुंतवणूक २२ टक्क्यांनी घसरल्याचे दिसत आहे.
मागील कल पाहता, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा प्रवाह वाढण्याची अपेक्षा होती. मात्र जागतिक अडचणी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग (एफपीआय) विक्रीचा मारा सुरू असूनही, भारतात गुंतवणुकीला पसंती राहणे, हे बाजारासाठी खूप सकारात्मक आहे, असे मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी म्हणाले.
ऑगस्टमध्ये लार्ज-कॅप फंडांमध्ये २,८३५ कोटींची गुंतवणूक झाली, जी जुलैमधील २,१२५ कोटींपेक्षा जास्त आहे. मिड-कॅप फंडांमध्ये गेल्या महिन्यातील ५,१८२ कोटींच्या तुलनेत ५,३३१ कोटींची गुंतवणूक झाली. मात्र, स्मॉल-कॅप फंडांमध्ये जुलैमधील ६,४८४ कोटींच्या तुलनेत ४,९९३ कोटींची गुंतवणूक झाली. रोखेसंलग्न योजनांमध्ये, ऑगस्टमध्ये १३,३५०.०६ कोटींची नक्त गुंतवणूक आली. त्याआधीच्या जुलैमध्ये ही गुंतवणूक ३९,३५५ कोटींची होती.
एकंदर म्युच्युअल फंड उद्योगाने ऑगस्टमध्ये ५२,४४३ कोटी रुपयांची गुंतवणूक अनुभवली, जी जुलैमधील १.८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी ऑगस्टमध्ये म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) ७५.१८ लाख कोटी रुपये झाली आहे, जी आधीच्या महिन्यात ७५.३५ लाख कोटी रुपये होती.