मुंबईः सौर वीज तसेच अन्य नागरी तसेच पायाभूत सुविधांचे बांधकाम आणि ईपीसी सेवा प्रदाती कंपनी करन्ट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री (आयपीओ) सुरू करत असून, ही विक्री २९ ऑगस्टला बंद होईल. ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर समभागांच्या सूचीबद्धतेसाठी या विक्रीतून कंपनीने ४१.८० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आयपीओमधून मिळणारा निधी पूर्ण मालकीची उपकंपनी, करन्ट इन्फ्रा धनबाद सोलर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी वापरले जाईल. ‘रेस्को मॉडेल’ अंतर्गत ही कंपनी १८०० किलोवॅट सोलर प्रकल्पाची स्थापना धनबाद, झारखंडमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी करत आहे. ‘रेस्को मॉडेल’ म्हणजे करन्ट इन्फ्राकडून स्व-भांडवल गुंतवून सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना, विकास करून, तो प्रकल्प चालविला जाईल, त्या बदल्यात तिला ठरलेल्या दराने वीज वापराचे भाडे दरमहा मिळत राहिल. ज्यायोगे कंपनीला ताडबतोबीने रोखीचा प्रवाह खुला होण्यासह, खेळत्या भांडवलाची चणचण जाणवणार नाही. अशा प्रकारचे आणखी दोन प्रकल्पांवर करन्ट इन्फ्राचे सध्या काम सुरू आहे. शिवाय आयपीओ निधीतून कंपनीची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण केली जाईल.

होलानी कन्सल्टंट्स ही कंपनी या आयपीओचे व्यवस्थापन पाहत आहे. गुंतवणूकदारांना प्रति समभाग ७६ रुपये ते ८० रुपये किमत पट्ट्यात बोली लावून या एसएमई आयपीओमध्ये सहभागी होता येईल. ‘रेस्को प्रकल्प’ हे अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात कंपनीचे स्थान मजबूत करण्यासाठी मोठी संधी असून, देशभरात या धर्तीच्या अनेक प्रकल्पांच्या उभारणीचे कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत, असे करन्ट इन्फ्राचे अध्यक्ष सुनील सिंग गंगवार म्हणाले.

कंपनीने आजवर देशभरात १२ राज्यांत छोट्या-मोठ्या नागरी पायाभूत सुविधांचे ८७ प्रकल्प पूर्ण केले असून, आगामी दोन वर्षात पूर्ण केली जाणारे सुमारे २८० कोटी रुपये खर्चाच्या २४ प्रकल्पांचे कार्यादेश कंपनीकडे आहेत. २०१३ साली सुरुवात करणाऱ्या या कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, ९०.८८ कोटी रुपयांच्या महसूलावर, ९.४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.