पीटीआय, नवी दिल्ली
मीठ ते अद्ययावत सॉफ्टवेअर बनवणाऱ्या टाटा समूहातील ६६ टक्के हिस्सा नियंत्रित करणाऱ्या टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, एसपी समूहाचे अध्यक्ष शापूरजी पालनजी मिस्त्री यांनी शुक्रवारी टाटा सन्सच्या सूचिबद्धतेची पुन्हा एकदा मागणी केली.

शापूरजी पालनजी कुटुंबाची टाटा सन्समध्ये सुमारे १८.३७ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा सन्सने तिचे समभाग ‘आयपीओ’द्वारे भांडवली बाजारात सूचिबद्ध करणे बंधनकारक असलेल्या ३० सप्टेंबर या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अंतिम मुदतीचे पालन केलेले नाही. यामुळे सूचिबद्धतेचा टाटा समूहाने गांभीर्याने विचार करावा असे मिस्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे. शापूरजी पालनजी समूहाने कायमच टाटा सन्सच्या सूचिबद्धतेबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, असे मिस्त्री म्हणाले.

या सूचिबद्धतेमुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या १.२ कोटींहून अधिक भागधारकांसाठी प्रचंड मूल्य निर्माण होईल. ज्या नागरिकांनी दशकांपासून ‘टाटा’ नावावर अखंडता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून विश्वास ठेवला आहे, त्यांच्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टाटा सन्सच्या सूचिबद्धतेमुळे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी कल्पना केलेल्या पारदर्शकतेच्या भावनेलाच चालना मिळेल. तसेच टाटा समुहावरील सर्व भागधारकांसह कर्मचारी, गुंतवणूकदार आणि भारतातील नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होईल. टाटा सन्सने रिझर्व्ह बँकेच्या नियामक चौकटीत राहून सार्वजनिक हिताच्या तत्त्वांवर आधारित निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मिस्त्री यांनी नमूद केले. टाटा सन्सची सूचिबद्धता हे एक नैतिक पाऊल आणि सामाजिक गरज देखील आहे, असे मिस्त्री म्हणाले.

विश्वस्तांमधील अंतर्गत कलहात केंद्राची मध्यस्थी

विश्वस्तांमधील अंतर्गत कलहाची बाब केंद्र सरकारपर्यंत पोहोचली. परिणामी सरलेल्या मंगळवारी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकही झाली. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि विश्वस्त दरायस खंबाटा यांनी यासमयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दिवंगत सायरस मिस्त्री यांना अनपेक्षितपणे काढून टाकल्यानंतर शापूरजी पालनजी समूह आणि टाटा समूहातील संबंध ताणले गेले आहेत. शापूरजी पालनजी कुटुंबाकडे टाटा सन्समध्ये सुमारे १८.३७ टक्के हिस्सा आहे. ही हिस्सेदारी विकून मिळणारा निधी शापूरजी पालनजी समूह त्यांचे कर्ज फेडण्यासाठी करण्याचा विचार करत आहे.