मुंबईः धातूंच्या समभागांतील तेजी आणि वस्तू व सेवा परिषदेच्या बैठकीतील कर-कपातीच्या निर्णयासंबंधी आशावादामुळे बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी प्रचंड अस्थिर सत्रातही वाढ साधली. उच्चांकी आणि नीचांकी पातळी दरम्यान चढ-उताराचे हिंदोळ्यांनंतर, बीएसई सेन्सेक्स ४०९.८३ अंशांनी (०.५१ टक्के) वाढून ८०,५६७.७१ वर स्थिरावला. दिवसभरात, या निर्देशांकाने ८०,६७१.२८ चा उच्चांक दाखविला, तर त्याचा नीचांक ६६६.६८ अंशांच्या फरकाने ८०,००४.६० असा होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १३५.४५ अंशांनी (०.५५ टक्के) वाढून २४,७१५.०५ वर दिवसअखेरीस स्थिरावला.
कर दराची ५ टक्के आणि १८ टक्के अशी द्विस्तरीय रचना आणण्यासह, सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तूंवरील करात कपातीवर चर्चा करण्यासाठी जीएसटी परिषदेची दोन दिवसाची बैठक नवी दिल्लीत सुरू झाली आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांकडून हरकतीचे काही मुद्दे असले तरी उद्या (गुरुवारी) या बैठकीतून सर्वसहमतीतून अंतिम निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे. बुधवारच्या सत्रात परतलेली तेजी आणि नजीकच्या काळातील बाजाराचा कल बैठकीच्या निकालांवर अवलंबून आहे आणि त्याचा उपभोग-केंद्रित क्षेत्र आणि समभागांवर प्रभाव दिसून येईल, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले.
बुधवारच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्समधील टाटा स्टीलने सर्वाधिक ५.९० टक्क्यांनी वाढ नोंदवली. पोलाद उत्पादनात कपात करण्याच्या चीनच्या योजनेमुळे नफा वाढण्याची आशा असलेल्या धातू कंपन्यांच्या समभागांत परिणामी चांगलीच खरेदी दिसून आली. टायटन, महिंद्र अँड महिंद्र, आयटीसी, इटर्नल, स्टेट बँक आणि ट्रेंट हे सेन्सेक्समधील इतर वधारलेले समभाग होते.
अमेरिकी अर्थव्यवस्थेत कमकुवतपणा दिसून आल्याने, त्या बाजारपेठेतून महसुला मोठा वाटा येणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांत घसरण दिसून आली. ऑगस्टमध्ये सलग सहाव्या महिन्यात अमेरिकेतील उत्पादन क्षेत्रात घट झाल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले. त्या परिणामी, इन्फोसिस, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, अदानी पोर्ट्स आणि भारती एअरटेल हे घसरणीच्या यादीत राहिले. उद्योग क्षेत्रवार १६ प्रमुख निर्देशांकांपैकी आयटी निर्देशांक वगळता अन्य पंधरा निर्देशांकांनी वाढ केली.