मुंबई : भारत आणि अमेरिकेतील संभाव्य व्यापार कराराच्या अपेक्षेमुळे सुरू झालेल्या समभाग खरेदीच्या जोरावर गुरुवारी सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच निफ्टीने २५,००० अंशांची पातळी पुन्हा सर केली. तर सेन्सेक्सने १,२०० अंशांची उसळी घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १,२००.१८ अंशांची कमाई करत ८२,५३०.७४ या सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दुपारच्या सत्रात बँकिंग, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि तेल-वायू समभागांमधील तीव्र तेजीमुळे सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात १,३८७.५८ अंशांनी वधारून ८२,७१८.१४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३९५.२० अंशांची भर घातली आणि २५,०६२.१० या सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. याआधी १५ ऑक्टोबर २०२४ निफ्टीने २५,००० अंशांची पातळी गाठली होती.
देशांतर्गत आघाडीवर महागाई दरातील घसरण आणि भारतासोबतच्या संभाव्य व्यापार कराराबद्दल अमेरिकेकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे बाजाराने जोरदार पुनरागमन केले. वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या आणि गृहनिर्माणसारख्या दर-संवेदनशील क्षेत्रांनी ही तेजी दर्शवली. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह अध्यक्षांच्या आगामी भाषणाकडे लागले आहे, जे भविष्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत अधिक स्पष्टता प्रदान करेल अशी अपेक्षा आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचा समभाग ४ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, एटरनल, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्स यांचे समभाग तेजीत होते. बाजारातील तेजीच्या वातावरणात एकमेव इंडसइंड बँकेचा समभाग घसरणीसह बंद झाला.
शेअर बाजार गुंतवणूकदार ९ लाख कोटींनी श्रीमंत
सलग दोन सत्रातील बाजारातील तेजीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. भांडवली बाजारतील प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या सत्रात सात महिन्यातील उच्चांकी पातळीवर स्थिरावले आहेत. परिणामी दोन सत्रात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात ९.०८ लाख कोटी रुपयांची भर पडली असून ते ४४०.१९ लाख कोटी (५.१४ ट्रिलियन डॉलर) रुपयांवर पोहोचले आहे.
सेन्सेक्स ८२,५३०.७४ १,२००.१८ ( १.४८%)
निफ्टी २५,०६२.१० ३९५.२० ( १.६०%)
तेल ६३.६८ -३.६५%
डॉलर ८५.५० १८ पैसे