मुंबई: जागतिक बाजारातील तीव्र तेजीचे अनुकरण करत, सोमवारी स्थानिक बाजारात ‘सेन्सेक्स’ जवळजवळ ५६७ अंशांनी वधारला, तर निफ्टी २५,९०० च्या वर बंद झाला. अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या अमेरिकेतील महागाईने तेथे व्याजदरात कपातीच्या पुन्हा निर्माण झालेल्या शक्यतेने, गुंतवणूकदारांमध्ये आशावाद जागविला.

सोमवारी सत्रअखेरीस, सेन्सेक्स ५६६.९६ अंशांनी (०.६७ टक्के) वधारून ८४,७७८.८४ वर स्थिरावला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १७०.९० अंशांनी अर्थात ०.६६ टक्क्यांनी वधारून २५,९६६.०५ वर पोहोचला.

सत्रांतर्गत ७२०.२ अंशांच्या कमाईसह ८४,९३२.०८ या उचांकाला गाठत सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर पोहोचला होता. निफ्टी २०० अंकांपेक्षा जास्त वाढून २६,००५.९५ या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. निफ्टी निर्देशांक आता २६,२७७.३५ या त्याच्या सार्वकालिक उच्चांकापासून फक्त १ टक्का दूर आहे, तर सेन्सेक्स ८५,९७८.२५ या त्याच्या विक्रमी शिखरापेक्षा १.२ टक्के अंतरावर आहे. त्यामुळे तेजीची मालिका कायम राहिल्यास, दोन्ही निर्देशांक नवीन उच्चांक लवकरच स्थापित करतील, असे बाजारात उत्साही वातावरण आहे. अमेरिका-चीन व्यापार करार आणि परकीय गुंतवणूकदारांकडून निधीच्या नव्याने सुरू झालेल्या प्रवाहामुळे बाजारातील आशावाद वाढला, असे विश्लेषकांनी नमूद केले.

सेन्सेक्समधील भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, इटर्नल, स्टेट बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक हे प्रमुख वधारलेले समभाग होते. त्या उलट, कोटक महिंद्र बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स हे समभाग मागे पडले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पीएसयू बँक निर्देशांकाने चांगली कामगिरी केली, २.७६ टक्क्यांनी वाढ झाली, तर नफावसुलीमुळे संरक्षण आणि माध्यम क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण झाली.

भारतातील बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वी, आशियाई बाजारपेठांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग हे निर्देशांकांत वेगवान वाढ दिसून आली. तर दुपारनंतर खुल्या झालेल्या युरोपामधील बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. त्या आधी शुक्रवारी अमेरिकी बाजार सकारात्मक क्षेत्रात बंद झाले.

उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ६२१.५१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

बाजार तेजीला चालना कशामुळे?

अमेरिका-चीन यांच्या दरम्यान व्यापार चर्चेत प्रगती दिसून आल्यामुळे देशांतर्गत बाजारात तेजीवाल्यांना स्फुरण चढले. अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या अमेरिकेतील चलनवाढीच्या आकड्यामुळे या आठवड्यात तेथील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा पुन्हा बळावली आहे. ही कपात झाल्यास देशांतर्गत बाजारात परकीय गुंतवणुकीच्या प्रवाह प्रबळ बनवेल. एकंदरीत जागतिक स्तरावरील अडचणी कमी झाल्या आणि मजबूत देशांतर्गत सुधारणा या गोष्टी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणाऱ्या ठरल्या आणि सध्याच्या चढ्या मूल्यांकनांना समर्थन मिळाले, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नमूद केले.