पीटीआय, नवी दिल्ली
टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कॅपिटलची सुमारे १५,५११ कोटींची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) ६ ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. यासाठी कंपनीने ३१० ते ३२८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
या आयपीओमध्ये टाटा कॅपिटल लिमिटेडकडून दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या २१ कोटी नवीन समभागांची विक्री करणार आहे. त्यातून मिळणारा निधी हा कंपनीच्या व्यवसाय विस्तारासाठी आणि धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. यासोबतच, विद्यमान भागधारक आंशिक समभाग विक्री अर्थात ‘ओएफएस’च्या माध्यमातून २६.५८ कोटी समभागांची विक्री करतील. टाटा कॅपिटलने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून सुमारे ४७.५८ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. तसेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ३.५८ कोटी समभाग विक्री करेल.
टाटा कॅपिटलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. एप्रिलमध्ये टाटा कॅपिटलने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला होता.
ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाच्या सुमारे २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर टाटा कॅपिटलचा मोठा आयपीओ बाजारात धडकणार आहे. रिझर्व्ह बँकेने सूचिबद्धतेसाठी ३० सप्टेंबरची वेळ दिली होती, मात्र प्रक्रियात्मक कारणांमुळे त्यांनी मुदतवाढ दिली होती. या टाटा कॅपिटल आयपीओमध्ये सुकाणू गुंतवणूकदार बोली शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी बोली लावतील. तर सोमवार, म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी आयपीओ खुला होणार असून बुधवारी, ८ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करण्याची संधी आहे. शेअरचे वाटप गुरुवारी, ९ ऑक्टोबरपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळाले आहेत, त्यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी डीमॅट खात्यांमध्ये इक्विटी शेअर जमा केले जातील. टाटा कॅपिटलचे शेअर सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सुचिबद्ध होणार आहेत.
सध्या, टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सचा ८८.६ टक्के हिस्सा आहे, तर आयएफसीकडे १.८ टक्के हिस्सा आहे. या आयपीओद्वारे उभारण्यात आलेला निधी कंपनीच्या टियर-१ कॅपिटल बेसच्या वाढीसाठी वापरला जाईल, जेणेकरून भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण होतील, ज्यामध्ये पुढील कर्जे समाविष्ट आहेत.
सुमारे दोन दशकांच्या अवधीनंतर आलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओनंतर, आता भांडवली बाजाराला आजमावणारी टाटा समूहातील दुसरी कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी केली, १,०४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या ४७२ कोटी रुपयांपेक्षा दुप्पट राहिला आहे. एकूण उत्पन्न जून २०२४ च्या तिमाहीत ६,५५७ कोटी रुपयांवरून ७,६९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.