वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्या टाळेबंदी आणि पगार कपातीसारखे निर्णय घेत आहेत. आता टाटा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. देशातील दिग्गज टाटा समूहाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात १६ ते ६२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. अशा प्रकारे २२ लाख कोटी रुपयांच्या टाटा समूहाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, ट्रेंट आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन १६ ते ६२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. टाटा समूह १० व्हर्टिकलमध्ये सुमारे ३० कंपन्या चालवतो.
सीईओला किती पगार दिला ते जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहाने यंदा ट्रेंट लिमिटेडचे सीईओ पी वेंकटेशलू यांना पगारवाढ म्हणून ५.१२ कोटी रुपये पगाराच्या स्वरूपात दिले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६२% अधिक आहे. दुसरीकडे इंडियन हॉटेल्समधील त्यांचे समकक्ष पुनीत चटवाल यांना १८.२३ कोटी रुपये वार्षिक वेतन देण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्या पगारात ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. टाटा कंझ्युमर आणि व्होल्टासचे सीईओ असलेले सुनील डिसोझा आणि प्रदीप बक्षी यांना वार्षिक सुमारे ९.५ कोटी आणि ३.८ कोटी रुपये दिले जात होते. त्यांच्या पगारात अनुक्रमे २४% आणि २२% वाढ झाली आहे.
टाटा पॉवरच्या सीईओच्या पगारात १६ टक्क्यांनी वाढ
टाटा केमिकल्स आणि टाटा पॉवरच्या सीईओच्या पगारात १६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. टाटा केमिकल्सचे सीईओ आर मुकुंदन आणि टाटा पॉवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांच्या पगारात १६% वाढ झाली आहे. यावर्षी त्यांना अनुक्रमे ८ कोटी आणि ९ कोटी रुपये देण्यात आले. अहवालानुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांनाही २९.१ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
हेही वाचाः ‘फोर्ब्स’च्या यादीत रिलायन्सची ४५ व्या क्रमांकावर झेप, इतर भारतीय कंपन्या कुठे?
टाटा समूहाची स्थापना १८६८ मध्ये झाली
टाटा समूहाची स्थापना १८६८ मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्याचे मुख्यालय मुंबई शहरात आहे आणि हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह आहे. त्याचा व्यवसाय ६ खंडातील १०० देशांमध्ये पसरलेला आहे. २०२१-२०२२ या वर्षात टाटा समूहाच्या कंपन्यांचा महसूल १२८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ९.६ ट्रिलियन रुपये होता. टाटा समूहाच्या ३० कंपन्यांमध्ये सुमारे ९,३५,००० लोक काम करतात.