मुंबई: टाटा मोटर्सने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ८,५५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविल्याचे मंगळवारी जाहीर केले. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ५१ टक्के घसरण झाली आहे.
वाहन निर्मिती क्षेत्रातील टाटा मोटर्सने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला चौथ्या तिमाहीत १ लाख १९ हजार ५०३ कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला आहे. त्या आधीच्या वर्षातील याच तिमाहीत तो १ लाख १९ हजार ३३ कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) कंपनीला २८ हजार १४९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्याआधीच्या वर्षात निव्वळ नफा ३१ हजार ८०७ कोटी रुपये होता.
टाटा मोटर्सचा ब्रिटनस्थित आलिशान मोटारींचे अंग असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हरच्या (जेएलआर) वार्षिक महसुलातही १.७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तथापि भारत-ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करार मार्गी लागला असल्याने या मोटारींना आयात शुल्कात सवलत मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सचा एकूण महसूल ४ लाख ३९ हजार ६९५ कोटी रुपये नोंदविण्यात आला. त्या आधीच्या वर्षात एकूण महसूल ४ लाख ३४ हजार १६ कोटी रुपये होता. टाटा मोटर्सचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी भांडवली बाजारात कंपनीच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग १.७६ टक्क्यांच्या घसरणीसह ७०७.९० रुपयांवर बंद झाला. कंपनीने भागधारकांना प्रति समभाग ६ रुपयांच्या लाभांशाची शिफारस केली आहे.