पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) शुक्रवारी लंडनमध्ये कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजेंस -एआय) एक्सपिरीयन्स झोन आणि डिझाइन स्टुडिओ उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच येत्या तीन वर्षाच्या कालावधीत ५,००० लोकांची नव्याने भरती करणार आहे.

टीसीएसने सध्या संपूर्ण इंग्लंडमध्ये ४२,००० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, टीसीएसने इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत ३.३ अब्ज पौंडांचे योगदान दिले. कंपनीने मोठ्या प्रमाणावर एआय तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने कंपनी पुनर्रचनेतर्गत भारतात सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. मात्र कंपनीने आता लंडनमध्ये एआय अनुभव केंद्र (एक्सपिरीयन्स झोन) डिझाइन स्टुडिओ सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे इंग्लंडमध्ये त्यांच्या गुंतवणुकीत निरंतर वाढ होत आहे. रोजगार निर्मिती आणि प्रतिभा विकासाला बळ देण्यासाठी टीसीएस पुढील तीन वर्षांत इंग्लंडमध्ये ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. इंग्लंडमधील नवीन गुंतवणूक नवोपक्रमासंबधी उपक्रम राबवण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल, असे टीसीएसकडून सांगण्यात आले.

सप्टेंबरमध्ये अनावरण झालेल्या न्यू यॉर्क डिझाइन स्टुडिओनंतर लंडन स्टुडिओ टीसीएसचा दुसरे डिझाइन केंद्र आहे. इंग्लंडमधील शैक्षणिक संस्था, नवउद्यमी (स्टार्टअप) आणि इतर सहयोगींसोबत टीसीएस नवोपक्रमासंबधी परिसंस्था निर्माण करणार आहे. इंग्लंड ही जागतिक स्तरावर टीसीएसची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, असे टीसीएसचे इंग्लंड आणि आयर्लंडचे प्रमुख विनय सिंघवी म्हणाले.

इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानंतर टीसीएसने ही घोषणा केली आहे. स्टारमर म्हणाले की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सज्ज आहे आणि इंग्लंड या विकास प्रवासात भागीदार होणार आहे. स्टारमर यांची भारत भेट दोन्ही देशांमधील बाजारपेठेतील प्रवेश अधिक खोलवर नेणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये लंडन भेटीदरम्यान भारत-इंग्लंडदरम्यान व्यापार करार केला होता. इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत आलेल्या व्यावसायिक शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईतील टीसीएस बनियन पार्क कॅम्पसला भेट दिली.

टाटा समूह आमच्यासाठी एक महत्वाचा गुंतवणूकदार आहे, त्यामध्ये टीसीएस केंद्रस्थानी असून देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत वाढ होईल – जेसन स्टॉकवुड, इंग्लंडचे गुंतवणूक मंत्री