मुंबई : देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने विद्यमान आर्थिक वर्षातील सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत १२,०७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत १.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच टीसीएसने जगातील सर्वात मोठी कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याच्या मार्गावर असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने पुनर्रचना कार्यक्रम देखील हाती घेतला असून कौशल्ये नसलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या याच तिमाहीत टीसीएसने ११,९०९ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. तर सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २.३९ टक्क्यांनी वधारून ६५,७९९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्यावर्षीच्या याच तिमाहीत ६४,२५९ कोटी रुपये राहिले होते. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ५.३ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र महसूल ३.७ टक्क्यांनी वाढला आहे.
सध्या टीसीएसमध्ये ६,१३,०६९ कर्मचारी कार्यरत असून, १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहेत. कंपनीच्या इतिहासातील ही दुसरी मोठी नोकरकपात आहे. या आधीची पहिली कपात २०१२ मध्ये झाली होती. तेव्हा सुमारे २,५०० कर्मचाऱ्यांना खराब कामगिरीमुळे कामावरून काढून टाकण्यात आले होते.
एआयमध्ये आघाडी
टीसीएस ही जगातील सर्वात मोठी कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी भारतातील १ गिगावॅट क्षमतेचे एआय डेटासेंटर बांधण्यासाठी एक नवीन व्यवसाय संस्था आणि सेल्सफोर्स-केंद्रित कंपनी लिस्टएंगेजचे अधिग्रहण करण्यासह धोरणात्मक गुंतवणुकीची योजना आखली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी एआय तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्याच्या प्रवासात आहोत. एआयमधील वाढती गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास हे टीसीएसच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे टीसीएसचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के कृतिवासन म्हणाले.
टीसीएसकडून विद्यमान वर्षात ११८ लाभांश
सरलेल्या सप्टेंबर तिमाहीसाठी टीसीएसने भागधारकांसाठी प्रतिसमभाग ११ रुपये इतका दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी १५ ऑक्टोबर रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर ४ नोव्हेंबरला भागधारकांना लाभांश प्राप्त होईल. याआधीच्या तिमाहीत देखील ११ रुपये लाभांश दिला होता. यामुळे विद्यमान कॅलेंडर वर्षात आतापर्यंत टीसीएसने एकूण ११८ रुपयांचा लाभांश भरीव लाभांश दिला आहे.
गुरुवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग १.१४ टक्क्यांनी वधारून ३,०६१.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ११.०७ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.