मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक मंगळवारपासून सुरू होत असून, या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवले जातील, असा अंदाज स्टेट बँकेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात वर्तवला.रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे गुरुवारी ८ फेब्रुवारीला या बैठकीतील निर्णयांची माहिती जाहीर करतील. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर सध्या ६.५ टक्के आहे. ‘एसबीआय रिसर्च’च्या कयासानुसार, आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नाही. तथापि जूनमध्ये व्याजदरात कपातीचा मध्यवर्ती बँकेकडून विचार केला जाऊ शकतो अथवा ऑगस्ट महिन्यातील बैठकीत प्रत्यक्षात व्याजदर कपात होईल, अशी शक्यता अहवालाने व्यक्त केली आहे.

मूलभूत महागाईचा दर (खाद्यवस्तू व इंधन वगळून) २०२१ आणि २०२२ मध्ये सरासरी ६ टक्के होता. हा दर २०२३ मध्ये ५ टक्क्यांवर आला आहे. किरकोळ महागाई निर्देशांकावर आधारित महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात ५.४ टक्के आणि एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात ४.६ ते ४.८ टक्के या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, असे अहवालाचे अनुमान आहे.