पीटीआय, नवी दिल्ली
परकीय चलन बाजारातील अलीकडच्या काळातील मोठी अस्थिरता कमी करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी हस्तक्षेप करण्यात आल्याचे उत्तर रिझर्व्ह बँकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (आयएमएफ) दिले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचा दावाही मध्यवर्ती बँकेने केला आहे.
आयएमएफने अनुच्छेद चारअंतर्गत सल्लामसलत अहवाल जाहीर केला आहे. त्यात परकीय चलन दर आणि परकीय चलन बाजारपेठेतील हस्तक्षेप या अंगाने भारतावर ठपका ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रुपये-डॉलर विनिमयाच्या दरात अतिशय कमी चढउतार झाले आहेत. अस्थिर परिस्थितीत परकीय चलन बाजारपेठेत ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त हस्तक्षेप करण्यात आल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
विनिमय दरातील स्थिरता निदर्शनास आल्यामुळे भारतीय परकीय चलन बाजारपेठेचे वर्गीकरण वहनशीलवरून स्थिर व्यवस्था असे करावे लागले. बाह्य धक्के पचविणारे पहिला बचाव हा विनिमय दर लवचीकतेतून आहे, असे अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने हे आरोप फेटाळून लावले असून, चलन विनिमय दर बाजारपेठेनुसार ठरतात, असा दावा केला आहे.
हेही वाचा >>>वॉशिंग पावडर निरमा… एकेकाळी लोन काढून अंगणात सुरू केलेला बिझनेस; आज आहे कोट्यवधींचा ब्रँड
अवमूल्यनासोबत मूल्यवर्धनातही हस्तक्षेप
रिझ्रर्व्ह बँकेने म्हटले आहे की, परकीय चलन बाजारपेठ चलन विनिमय दर ठरवते. एका ठरावीक चलनाच्या मूल्याला लक्ष्य केले जात नाही. अतिस्थिरता निर्माण झाल्यास हस्तक्षेप करण्याचे पाऊल रिझर्व्ह बँक उचलते. रुपयाचे मूल्य जास्त घसरू नये अथवा जास्त वाढू नये, यासाठी हा हस्तक्षेप केला जातो. रुपयाचे जास्त अवमूल्यन झाल्यास आयात महाग होऊन इंधन, खाद्यतेल यांचे दर वाढतात. याच वेळी रुपयाचे जास्त मूल्य वाढल्यास निर्यातीला फटका बसतो.
रिझर्व्ह बँकेकडून ३१ कोटी डॉलरच्या परकीय चलनाची विक्री
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर महिन्यात ३१ कोटी डॉलरच्या परकीय चलनाची परकीय चलन विनिमय बाजारपेठेत केली आहे. आधीच्या सप्टेंबर महिन्यात बँकेने १.५१ अब्ज डॉलरच्या परकीय चलनाची विक्री केली होती. रिझर्व्ह बँकेने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. यानुसार, रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमध्ये ३६.६ अब्ज डॉलरच्या परकीय चलनाची खरेदी आणि ३६.९ अब्ज डॉलरच्या परकीय चलनाची विक्री केली. डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुपया ०.३ टक्क्याने घसरला. तो ८३.०३ ते ८३.२८ या पातळीदरम्यान व्यवहार करत होता.