मुंबई : लोकप्रिय डिजिटल देयक प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. धनत्रयोदशी ते दिवाळी या सणोस्तवाच्या काळात सर्वाधिक व्यवहार ‘यूपीआय’च्या माध्यमातून पार पडले आहेत, असे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आकडेवारीतून समोर आले.

तीन दिवसांच्या या कालावधीत सरासरी ‘यूपीआय’ व्यवहार संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५६.८ कोटींवरून ७३.७ कोटी व्यवहार प्रतिदिन झाली आहे, जी व्यवहारांच्या संख्येत ३० टक्के वाढ दर्शवते.

‘यूपीआय’ व्यवहार चार वर्षांत तिप्पट

व्यवहारांचे एकूण मूल्य २.७ टक्के वाढले असले तरी, कमी मूल्याच्या किरकोळ आणि व्यापारी देयकांच्या एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये मोठा वाटा आहे.

इतर डिजिटल देयक असलेल्या क्रेडिट कार्ड्सच्या व्यवहारांमध्येदेखील जोरदार वाढ झाली आहे, विशेषतः ऑनलाइन. क्रेडिट कार्ड ई-कॉमर्स मंचावर होणाऱ्या व्यवहांरामध्ये वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ झाली आहे. तर डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी २४ टक्क्यांनी घटली आहे, ज्यामुळे क्रेडिट-आधारित डिजिटल खर्चाकडे होणारे बदल अधोरेखित झाले आहेत. एकूण क्रेडिट कार्ड व्यवहारांचे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढले असले तरी, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत २५.५ टक्क्यांपेक्षा कमी होते.

गेल्या तीन दिवाळींमध्ये, ‘यूपीआय’ व्यवहारांचे प्रमाण तिप्पट झाले आहे, २०२२ मध्ये २४.५ कोटी व्यवहार पार पडले होते, ते २०२५ मध्ये ७३.७ कोटींवर पोहोचले आहे, तर एकूण व्यवहार मूल्य दुपटीने वाढून ८७,५६९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

वर्ष व्यवहार संख्या

  • २०२२ – २४.५४ कोटी
  • २०२३ – ४२.०५ कोटी
  • २०२४ – ५६.८४ कोटी
  • २०२५ – ७३.७ कोटी