नवी दिल्ली : डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)’ प्रणालीमार्फत व्यवहार संख्या आणि मूल्यामध्ये मार्च २०२४ च्या तुलनेत एप्रिलमध्ये अनुक्रमे १ टक्के आणि ०.७ टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. सरलेल्या एप्रिलमध्ये १९.६४ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार पार पडले, जे मार्चमध्ये १९.७८ लाख कोटी रुपये राहिले होते. तर मार्चमध्ये एकूण व्यवहार संख्या १३.४४ अब्ज होती, त्या तुलनेत एप्रिलमध्ये ती १३.३ अब्ज इतकी आहे.
हेही वाचा >>> Godrej Group Splits : गोदरेज समूहाचे कुटुंबीयांमध्ये विभाजन
देशभरात डिजिटल स्वीकृती आणि पर्यायाने वाढते व्यवहार हे यूपीआय-संलग्न देयक प्रणालीच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे. महिनागणिक ‘यूपीआय’ व्यवहारसंख्या आणि मूल्यही उत्तरोत्तर वाढत असताना, सरलेला एप्रिल महिना याला अपवाद ठरला आहे. मार्चच्या तुलनेत तात्काळ देयक सेवा (आयएमपीएस) व्यवहार मूल्यामध्ये एप्रिलमध्ये ७ टक्के आणि व्यवहारसंख्येत ५ टक्क्यांनी घट झाली आहे. मूल्याच्या दृष्टीने, व्यवहार एकूण ५.९२ लाख कोटी रुपयांचे होते, जे मार्चमध्ये ६.३५ लाख कोटी रुपये होते.