वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय दुग्ध उद्योग क्षेत्र अमेरिकेतील आयातीसाठी खुले झाल्यास त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसेल. भारतीय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल, असा अंदाज स्टेट बँकेच्या ताज्या अहवालाने सोमवारी वर्तवला.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार चर्चेत कृषी आणि दुग्ध उद्योग ही दोन महत्त्वाची क्षेत्रे आहेत. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचे पथक यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले असून, सोमवारपासून वाटाघाटी सुरू होणेही अपेक्षित आहे. अमेरिकेतील दुग्ध उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यामुळे अमेरिकेतील आयातीला हे क्षेत्र भारताने खुले केल्यास देशातील छोट्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होईल, याकडे स्टेट बँकेच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतीय दुग्ध उद्योग क्षेत्र खुले केल्यास देशात दुधाच्या किमतीत १५ टक्के घसरण होईल. यामुळे देशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचा फटका बसेल.
अमेरिकेसाठी दुग्ध उद्योग खुला केल्यास देशातील छोट्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होणारे गंभीर परिणाम या अहवालात मांडण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, भारतीय दुग्ध उद्योग अमेरिकेसाठी खुला केल्यास त्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होईल. त्यातून देशात दुधाची आयात वार्षिक २.५ कोटी टनांनी वाढेल. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्ध उद्योग अतिशय महत्त्वाचा आहे. सकल राष्ट्रीय मूल्यवर्धनात (जीव्हीए) दुग्ध उद्योगाचा वाटा २.५ ते ३ टक्के म्हणजेच ७.५ ते ९ लाख कोटी रुपये आहे. या क्षेत्रातून सुमारे ८ कोटी जणांना थेट रोजगार मिळतो. एकूण मूल्यवर्धनातील प्रत्येकी १ लाख रुपयांमागे एक रोजगार या क्षेत्रातून येतो.
उद्योगाच्या भविष्याबाबत चिंता
अमेरिकेसाठी भारतीय दुग्ध उद्योग खुला केल्यास दुधाच्या किमतीत सरासरी १५ टक्के घसरण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होणार आहे. एवढ्यापुरता हा परिणाम मर्यादित न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणारे हे क्षेत्र कमकुवत होईल. पशुखाद्य, इंधन, वाहतूक आणि विनामोबदला कौटुंबिक श्रम यांचा विचार करता यामुळे एकूण मूल्यवर्धनात ०.५१ लाख कोटी रुपयांची घट होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.