Warren Buffett only billionaire Sees wealth rise : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापर कर लादल्यानंतर जगभरातील शेअर बाजारामध्ये पडझड पाहायला मिळत आहे. यादरम्यान बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या संपत्तीमध्ये मात्र गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.एप्रिल २०२५ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती १२ अब्ज डॉलर्सने वाढून १५५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत १० व्यक्तींपैकी वॉरेन बफे हे एकमेव आहेत ज्यांची गेल्या काही महिन्यांमध्ये संपत्ती वाढली आहे.

वॉरेन बफे यांच्या संपत्तीत मार्चपासून ५ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे आणि त्यामुळे ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत ५ व्या स्थानावर पोहोचले आहेत. बर्कशायर हाथवे या त्यांच्या गुंतवणूक कंपनीचे शेअर्समध्ये गेल्या महिन्यात ३ टक्के वाढ झाली आहे. यामुळे त्यांची अंदाजे संपत्ती एका वेळेला जवळपास १६६ अब्ज डॉलर्सवर पोहचली होती.

याउलट इलॉन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये मात्र अनुक्रमे १३० अब्ज डॉलर्स, ४५ अब्ज डॉलर्स आणि २८ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. एलव्हीएमएचचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांनीही १८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या संपत्तीमध्येही ३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ असलेले वॉरेन बफे हे गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. “ओरॅकल ऑफ ओमाहा” म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे हे एक प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती, गुंतवणूकदार आणि फिलांथ्रोपिस्ट आहेत. वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवेमधील गुंतवणुकीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या संपत्ती आणि गुंतवणुकीच्या सवयींमुळे त्यांची अनेक वेळा चर्चा झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९४ वर्षीय वॉरेन बफे हे फक्त त्यांच्या संपत्तीसाठीच ओळखले जात नाहीत. ते मोठ्या प्रमाणात पैसे दान करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांची ९९ टक्क्यांहून अधिक संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आजवर ६२ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. यातील सर्वाधिक रक्कम ही गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दान करण्यात आली आहे. हे फाऊंडेशन त्यांची मुले चालवतात. २०१० मध्ये बफेट आणि बिल गेट्स यांनी इतर अब्जाधीशांनाही त्यांच्या संपत्तीचा किमान अर्धा भाग समाज कार्यांसाठी दान करण्याचे आवाहन केले गेले होते.