नवी दिल्ली: कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय, रोबोटिक्स, प्रगत ऊर्जा प्रणाली आणि सेन्सर नेटवर्क ही चार उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे जागतिक रोजगार आणि श्रम बाजारपेठेला आकार देण्यासाठी सज्ज झाली आहेत आणि जगभरातील ८० टक्के कामगारांना रोजगार देणाऱ्या सात प्रमुख क्षेत्रांवर याचा सर्वाधिक परिणाम अपेक्षित आहे, असा इशारा मंगळवारी एका महत्त्वपूर्ण पाहणीच्या निष्कर्षांने दिला.

नव्याने आलेल्या या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढविली जाईल. बरोबरीने कृषी, निर्मिती क्षेत्र, बांधकाम, घाऊक आणि किरकोळ व्यापार, वाहतूक आणि दळणवळण, तसेच व्यवसाय, व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणून, नवीन संधी निर्माण करण्यात त्यांची भूमिका राहिल, असे जागतिक आर्थिक मंच अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) त्यांच्या ‘जॉब्स ऑफ टुमारो’ या शीर्षकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

सध्या जागतिक चर्चा ही केवळ कार्यालयीन नोकऱ्या आणि त्यावरील परिणामांवर केंद्रित आहे. तथापि उदयोन्मुख तंत्रज्ञान या पलीकडे वास्तविक जगात बदल कसा घडवून आणत आहेत हे या अहवालाने अधोरेखित केले आहे.

‘तंत्रज्ञान विकासाचा मार्ग हा आता आणि येणाऱ्या काळात घेतलेल्या निर्णयांद्वारे निश्चित केला जाईल,’ असे डब्ल्यूईएफचे श्रम, वेतन आणि रोजगार निर्मिती विभागाचे प्रमुख टिल लिओपोल्ड म्हणाले. नोकऱ्या गमावल्या जातील, या भीतीला टाळून त्यांच्या मते, उत्पादकता वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी गुंतवणूक भांडवल एकत्रित करणे, जागतिक तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवणे आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे यासाठी विविध घटकांच्या एकत्रित कृतीची गरज आहे.

जगातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास ८० टक्के नोकऱ्या निर्माण करणाऱ्या सात क्षेत्रांमध्ये कोणते तंत्रज्ञान सर्वात परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करेल आणि ते कसे परिवर्तन घडवून आणेल, हे समजून घेणे हे त्यांच्या परिणामाचा अंदाज घेण्यासाठी आणि हे परिणाम सकारात्मक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे लिओपोल्ड म्हणाले.

ड्रोन तंत्रज्ञान आधीच संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यक्षम शहरी वितरण आणि ग्रामीण घानामध्ये वैद्यकीय उपकरणे यासारख्या महत्त्वाच्या पुरवठ्याची वाहतूक सक्षम करत आहे. अनेक आफ्रिकी देशांमध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रणाली ही कामगारांचे कामाचे तास स्थिर करत आहे आणि वीज कपातीदरम्यान त्यांना घरी पाठवण्यापासून रोखत आहे, अशी सकारात्मक परिणामाची उदाहरणे अहवालात आहेत.

अपारंपरिक स्रोतातून वीज निर्मिती आणि साठवणूक तंत्रज्ञान घाऊक आणि किरकोळ व्यापार कामगारांमध्येही परिवर्तन घडवत आहे. दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतात, घाऊक विक्रेते वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी छतावरील सौर पॅनेल आणि बॅटरीचा वापर करत आहेत, असे अहवालाने नमूद केले आहे.

अहवालात हे देखील नमूद केले आहे की, अर्ध-स्वयंचलित बांधकाम उपकरणे कामगारांवरील शारीरिक ताण कमी करत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेचा पैलू सुधारत आहे. याव्यतिरिक्त, रोबोटिक्स आणि एआय डेटा प्रोसेसिंगमुळे रुग्णांच्या प्रवासाची आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील कार्यबलाची पुनर्रचना करता आली आहे. पुढील परिवर्तनांचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी नियोक्ते, सरकार आणि तंत्रज्ञान विकासकांकडून सानुकूलित सहयोगी कृतीची गरज या अहवालाने अधोरेखित केली आहे.