मुंबई : अमेरिकेच्या व्यापार कराराशीसंबंधित चिंता आणि जागतिक बाजारपेठेतील व्यापक विक्रीचा दबावामुळे धातू, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात मोठी घसरण अनुभवली. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या समभाग विक्रीच्या माऱ्यानेनिराशा आणखी वाढली.

सप्ताहअखेरच्या अस्थिर सत्रात, मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स ५८५.६७ अंशांनी घसरून ८०,५९९.९१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६९०.०१ अंशांची झड अनुभवली आणि ८०,४९५.५७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३ अंशांची घसरण झाली आणि तो २४,५६५.३५ पातळीवर बंद झाला.अमेरिकेच्या आयात करासंबंधित नवीन धमक्या आणि दंडात्मक शुल्कांचा दबावामुळे बाजारात निराशेचे वातावरण होते. वाढत्या करामुळे

जागतिक व्यापारात भारताची स्पर्धात्मकता कमकुवत होऊ शकते. गुंतवणूकदारांच्या भावना आणखी कमकुवत झाल्या असून परदेशी गुंतवणूकदार आता वायदे बाजारात शॉर्ट पोझिशन घेऊन आहेत, ज्यामुळे वाढलेली सावधगिरी दिसून येते. विक्रीचा वेग व्यापक असला तरी, आकर्षक मूल्यांकन, लवचिक मागणी आणि बाह्य व्यापार व्यत्ययांना सापेक्ष प्रतिकारशक्ती यांच्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्र आकर्षक आहेत, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

चिंतेचे कारण काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर देशांवर नवीन कर लादले आहेत, ज्यामध्ये भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्यात आला आहे. यामुळे जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता असून नवीन तणाव आणि चिंता निर्माण झाल्या आहेत. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाच डझनहून अधिक देशांसाठी कर वाढवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली, तर काही देशांसमवेत व्यापार करारांसाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. ट्रम्प यांनी आतापर्यंत सुमारे ७० राष्ट्रांसाठी अतिरिक्त शुल्क जाहीर केले. १ ऑगस्ट ही शुल्काची अंतिम मुदत असताना, नवीन कर ७ ऑगस्टपासून लागू होतील.

कोणत्या क्षेत्रांना झळ

अमेरिकेच्या निर्णयाशीसंबंधित क्षेत्रांनी पडझड अनुभवली. औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला झळ पोहोचली. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, टाटा स्टील, मारुती, टाटा मोटर्स, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि टेक महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक घसरले. तर ट्रेंट, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, कोटक महिंद्र बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची कामगिरी चमकदार होती. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी ५,५८८.९१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.