पीटीआय, नवी दिल्ली
अन्नधान्य, इंधन आणि उत्पादित वस्तूंचा किमती कमी झाल्याने एप्रिलमध्ये घाऊक महागाई दरात ०.८५ टक्के असा १३ महिन्यांच्या नीचांक दर्शविणारी घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीने बुधवारी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या मते मे महिन्यात त्यात आणखी घसरणीची शक्यता आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर महागाई दर सरलेल्या एप्रिलमध्ये ०.८५ टक्क्यांवर आला आहे. याआधीचा त्याचा तळ मार्च २०२४ मध्ये ०.२६ टक्के नोंदविला गेला होता. मार्च २०२५ मध्ये २.०५ टक्के नोंदवला गेला होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो १.१९ टक्के राहिला होता.
अन्नधान्य उत्पादने, इतर उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, इतर वाहतूक उपकरणांचे उत्पादन आणि यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन इत्यादींच्या किमती नरमल्यामुळे एप्रिल २०२५ मध्ये घाऊक चलनवाढीचा दर सकारात्मक पातळीवर राहिला आहे, असे उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र प्रामुख्याने अन्न, इंधन आणि वीज यांच्यातील घसरणीमुळे घाऊक महागाई नरमली आहे.
मार्चमधील १.५७ टक्के महागाई दराच्या तुलनेत एप्रिलमध्ये अन्नपदार्थांमधील महागाई उणे ०.८६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. भाजीपाल्यांमध्ये एप्रिलमध्ये उणे १८.२६ टक्के घसरण झाली, तर मार्चमध्ये त्यातील महागाई दर उणे १५.८८ टक्के नोंदवला गेला होता. कांद्यात, एप्रिलमध्ये महागाईचा दर ०.२० टक्के झाला, जो मार्चमध्ये २६.६५ टक्के होता. फळांमध्ये महागाईचा दर कमी होऊन ८.३८ टक्के झाला, जो मागील महिन्यात २०.७८ टक्के होता. बटाटा आणि डाळींमध्ये अनुक्रमे उणे २४.३० टक्के आणि उणे ५.५७ टक्के घसरण झाली.
येत्या महिन्यांत घाऊक महागाई दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये मुख्यतः इंधन आणि विजेच्या दरातील घसरण उणे २.१८ टक्के होती, तर मार्चमध्ये ती ०.२० टक्के राहिली होती. केरोसीन आणि विमानाचे इंधन (एटीएफ) आणि खनिज तेलांच्या किमतींमध्ये सलग झालेली तीव्र घसरण याला कारणीभूत ठरली आहे, असे बार्कलेजच्या संशोधन टिपणांत म्हटले आहे.
खनिज तेलात घसरण
एप्रिलमध्ये खनिज तेलाच्या किमती साधारणपणे ६० ते ६५ डॉलर प्रति पिंप राहिल्या आहेत. ‘ओपेक प्लस’ देशांनी उत्पादन वाढीची घोषणा केल्याने पुरवठा अधिक वाढला आहे. ओपेक प्लस हा २३ तेल उत्पादक देशांचा गट आहे, जो जागतिक तेलाच्या किमतींवर प्रभाव टाकण्यासाठी तेलाचा पुरवठा व्यवस्थापित करण्यासाठी एकत्र काम करतो.
केरळमध्ये यंदा मान्सून लवकर सक्रिय होण्याची शक्यता आहे. देशात सामान्यापेक्षा अधिक पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने ते पिकांसाठी सकारात्मक आहे. परिणामी, खाद्यान्न महागाई भविष्यात आणखी घटण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक सरासरी २ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.राहुल अग्रवाल, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, इक्रा