पीटीआय, नवी दिल्ली 
विद्यमान आर्थिक वर्षातील सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी १६ टक्क्यांनी घटली आहे. सोन्याचे ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेले दर आणि त्या परिणामी ग्राहकांच्या खरेदीचा भर ओसरला असला, तरीही सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) गुरुवारी सांगितले.
डब्ल्यूजीसीच्या अहवालाप्रमाणे, तिसऱ्या तिमाहीत एकूण सोन्याची मागणी २४८.३ टनांवरून २०९.४ टनांपर्यंत घसरली आहे. मात्र, मागणीचे मूल्य २३ टक्क्यांनी वाढून १,६५,३८० कोटी रुपयांवरून, २,०३,२४० कोटी रुपयांवर पोहोचले, जे सोन्याच्या किमतींतील झपाट्याने झालेल्या वाढीला दर्शवते.
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठा सराफा बाजार असलेल्या भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी १७१.६ टनांवरून ३१ टक्क्यांनी घसरून ११७.७ टनांवर आली. परंतु खरेदीदारांनी वाढलेल्या किंमतींशी जुळवून घेतल्याने दागिन्यांच्या खरेदीचे मूल्य सुमारे १,१४,२७० कोटी रुपयांवर स्थिर राहिले.
सोने महाग असले तरी दीर्घावधीत सोन्यातील परतावा महागाईवर मात करणारा राहिला आहे. सणोत्सवाचा हंगाम आणि ऑक्टोबर महिन्यात दिवाळीदरम्यान झालेल्या जोरदार विक्रीमुळे, सराफा बाजारात आशावादी वातावरण कायम आहे. सोने विक्रीत १६ टक्क्यांची घट झाली असली तरी विक्री मूल्यात झाली २३ टक्के वाढीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन म्हणाले.
सप्टेंबर तिमाहीत भारतातील सरासरी सोन्याचा भाव ९७,०७४.९ रुपये प्रति १० ग्रॅम राहिला, जो गेल्या वर्षीच्या ६६,६१४.१ रुपयांच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये आयात शुल्क आणि वस्तू-सेवाकराचा समावेश करण्यात आलेला नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती सरासरी ३,४५६.५ डॉलर प्रति औंस होत्या, ज्या मागील वर्षीच्या याच कालावधीत २,४७४.३ डॉलर पातळीवर होत्या.
सोन्याची भारतातील आयात ३७ टक्क्यांनी घसरून ३०८.२ टनांवरून १९४.६ टन झाली आहे, तर पुनर्वापर ७ टक्क्यांनी घसरून २१.८ टन राहिला आहे. विद्यमान वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत ४६२.४ टनांच्या मागणीनंतर, संपूर्ण वर्षात सोने मागणी ६००-७०० टन राहणे अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर तिसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १,३१३ टनांपर्यंत वाढली, जी विक्रमी आहे. जागतिक स्तरावरील वाढ प्रामुख्याने मध्यवर्ती बँकांच्या खरेदी आणि गुंतवणुकीमुळे झाली, ज्यामध्ये नॅशनल बँक ऑफ पोलंड ही सर्वात मोठी खरेदीदार ठरली आहे.
भारतीय ग्राहक दरडोई उत्पन्न आणि खर्च करण्यायोग्य उत्पन्नातील वाढीचा फायदा घेत आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत किमती वाढल्याने अनेक ग्राहकांनी खरेदी लांबवली आहे. अनिश्चितता, संभाव्य व्यापार युद्धे आणि देशांनी सोन्याच्या साठा वाढवल्याने सोन्याच्या किमतीत सतत वाढ सुरू आहे. -सचिन जैन, प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी, डब्ल्यूजीसी
