मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोला सरलेल्या तिमाहीत ३,३३६.५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मजबूत कार्यादेशांमुळे निव्वळ नफ्यात ९.८ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या या कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीत ३,०३६.६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत महसूल किरकोळ वाढून २२,१३४.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्यावर्षी याच तिमाहीत २१,९६३.८ कोटी रुपये होता. मात्र तिमाही आधारावर नफा आणि महसूल अनुक्रमे ७ टक्के आणि १.६ टक्क्यांनी घटला आहे.
वाढत्या अनिश्चिततेमुळे एकूण मागणी मंदावली आहे. यामुळे ग्राहक कंपन्यांनी हात आखडता घेतल्याने त्यांच्या खर्चात कपात केली आहे. मात्र कंपनीने ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत कृत्रिम प्रज्ञा (एआय), विदा (डेटा) आणि आधुनिकीकरण कार्यक्रमांना गती दिली आहे. अनेक एआयसंबंधित प्रकल्प आणि त्यातील मागणीचा कल स्पष्ट दिसत असल्याने प्राधान्यांशी त्वरित जुळवून घेतले, असे विप्रोच्या मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनी पल्लिया म्हणाले.
विप्रोच्या कर्मचाऱ्यांची संख्या पहिल्या तिमाहीत ११४ ने कमी झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीमध्ये एकूण २,३३,२३२ कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरसाठी ५ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनी वर्षातून दोनदा लाभांश देण्याचा प्रयत्न करेल, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा लाभांश देण्याचा प्रयत्न असेल, असे कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी विप्रोच्या अपर्णा अय्यर म्हणाल्या. मुंबई शेअर बाजारात विप्रोचे शेअर ०.९३ टक्क्यांनी घसरून २६०.२५ रुपयांवर स्थिरावले. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,७३,१७९ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.