मुंबई: भारतातील अकुशल कामगार तसेच निम्न-कुशल श्रमकऱ्यांना (ब्ल्यू आणि ग्रे कॉलर कामगार) मिळणारा मेहनतीचा मोबदला कमी असला, तरी अशा कामगारांना मागणी मोठी आहे. हे त्यांच्या पगारात मागील दोन वर्षांत झालेली तब्बल २३ टक्क्यांनी वाढीने स्पष्ट केले आहे, असे या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा मंच असलेल्या ‘वर्कइंडिया’ने सर्वेक्षणाअंती म्हटले आहे.

वर्कइंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘सॅलरी रिपोर्ट २०२५’ अहवालात, २०२३ ते २०२५ दरम्यान झालेल्या पगारातील मोठे बदल, कार्यस्थळातील नवप्रवाह आणि उद्योगवाढीचे चित्र मांडले आहे. हा अहवाल देशातील ब्ल्यू आणि ग्रे कॉलर कामगारांसाठी वाढती मागणी तसेच संधी अधोरेखित करतो. २०२५ मध्ये या कामगारांच्या पगारात सरासरी किमान ९ टक्के आणि कमाल १३ टक्के वाढ झाली आहे, तर दोन वर्षांतील एकत्रित वाढ सरासरी २३ टक्क्यांच्या घरात जाणारी आहे. तथापि, पगारवाढीच्या या निष्कर्षांमध्ये लिंग, भौगोलिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र या आधारावर मोठी विषमता असल्याचेही अहवाल नमूद करतो.

पुरुष कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा किमान दर ९ टक्के, तर महिलांच्या बाबतीत हाच दर फक्त ६ टक्के राहिल्याचे अहवाल सांगतो. महानगरांबाहेरील शहरे ही वाढीची चालक ठरत असून, तेथे पगारात सरासरी १४ टक्क्यांची, तर महानगरांत पगारवाढीचा दर सरासरी १० टक्क्यांच्या आसपास होता. वेतन मोबदल्यातील या विषम विभागणीवर सामाजिक अंगाने मोठे काम होण्याची गरज आहे, असे वर्कइंडियाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश डुंगरवाल म्हणाले. शिवाय मासिक जेमतेम २०,००० रुपयांचे वेतन असलेल्या नोकऱ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्णवेळ रोजगारात दरवर्षी १० ते १५ टक्के इतकी स्थिर वाढ, तर अर्धवेळ नोकऱ्यांमध्ये अस्थिरता दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२४ मध्ये अशा संधींमध्ये तब्बल ३२ टक्के वाढ झाली होती, मात्र २०२५ मध्ये त्यांचे प्रमाण १२ टक्क्यांवर घटले आहे.

पहिल्यांदाच नोकरीला लागलेल्या नवतरुणांना या बदलत्या रोजगार चित्राचा फायदा झाला आहे. २०२४ ते २०२५ दरम्यान त्यांच्या पगारात १२ ते १३ टक्के वाढ झाली आहे. अनुभवी नोकरदारांच्या पगारात दरवर्षी ८ ते १४ टक्के इतकी स्थिर वाढ दिसली. शैक्षणिक पात्रतेने पगारवाढीत निर्णायक भूमिका बजावली, ज्यात पदवीधरांनी सर्वाधिक झेप घेतली आहे. २०२५ मध्ये पदवीधरांच्या सरासरी कमाल पगारात १८ टक्के वाढ झाली.

उद्योगनिहाय आयटी क्षेत्र हे संधी आणि पगारवाढीच्या बाबतीत अग्रेसर ठरले असून, तेथे सरासरी किमान पगारात, प्रशिक्षित आयटी इंजिनीयर्सप्रमाणेच, ब्लू आणि ग्रे कॉलर संधींमध्ये ३१ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे टायपिस्ट आणि डेटा एन्ट्री पदांमध्ये तब्बल ४५ टक्के वाढ झाली. अभियांत्रिकी क्षेत्र (१०%) आणि इंटेरिअर्स अँड डिझाइनिंग (११%), तर तर ऑटोमोबाईल, डोमेस्टिक वर्क आणि मॅन्युफॅक्चरिंग (९%) क्षेत्रांत स्थिर वाढ दिसून आली.

मात्र, काही उद्योगांना मोठा फटका बसला आहे. श्रमकरी मजूर (लेबर) -३२%, अकाउंट्स आणि फायनान्स -१५%, तसेच हेल्थकेअर, सेल्स आणि ऑफिस क्षेत्रांत रोजगार संधींमध्ये सुमारे १०% घट झाली.