विलीनीकरणाचा करार रद्द केल्यामुळे आता झी एंटरटेन्मेंट सोनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. झी एंटरटेन्मेंटने १७ डिसेंबर २०२३ रोजी करार पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. झीने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की, ‘कंपनी तिच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचे मूल्यांकन करीत आहे आणि बोर्डाकडून निर्देश मिळाल्यानंतर भागधारकांच्या हितासाठी आवश्यक पावले उचलली जातील. त्याअंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, सोनी आणि BEPLच्या दाव्यांनाही लवादाच्या कारवाईत विरोध करण्यात येणार आहे.
चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही दोन्ही पक्ष प्रलंबित अटींवर सहमती दर्शवू शकले नाहीत. या अटींसाठी दोन्ही कंपन्यांकडून प्रभावी पुढाकार आवश्यक होता. कंपनीचे एमडी आणि सीईओ पुनित गोएंका विलीनीकरणाच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार होते आणि त्यासंबंधीच्या प्रस्तावावरही चर्चा झाली होती, असंही झीनं सांगितलं आहे.
हेही वाचाः अयोध्येत १० अब्ज डॉलर खर्च होणार, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा मिळणार
झीने असेही सांगितले की, त्यांनी विलीनीकरणाबाबत आपल्या बाजूने पूर्ण वचनबद्धता दाखवली आणि अनेक आवश्यक पावले उचलली, ज्यामुळे कंपनीला आता वेळ आणि पैशाचे नुकसान सहन करावे लागत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘असे असूनही कंपनी वेगवेगळ्या वाढीच्या संधी शोधत राहील.’ सोनीने झीसह विलीनीकरण योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचाः Ram Janmbhoomi Mandir : १००० वर्षे श्रीरामजन्मभूमी मंदिर टिकून राहणार, L&T चा दावा
विलीनीकरणाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, अटींवर करार न झाल्याने करार पुढे सरकला नाही.करार रद्द केल्यानंतर झीने सोनीकडे ९० दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. करारानुसार, विलीनीकरणाची योजना २१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायची होती. याशिवाय नियामक आणि इतर मंजुरीसाठी १ महिन्याचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता.
बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी २२ जानेवारी २०२४ रोजी जपानच्या सोनी समूहाने झीबरोबरचा १० अब्ज डॉलर विलीनीकरणाचा करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आणि झी एंटरटेन्मेंटला अधिकृतपणे समाप्ती पत्र पाठवले. ही माहिती झीने बाजार नियामकाशी शेअर केली. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहोचलेले झीचे एमडी पुनित गोयंका यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून हा मोठा करार तुटल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर आज पहाटे अयोध्येला पोहोचताच मला मेसेज मिळाला की, ज्या कराराची मी दोन वर्षे कल्पना करून काम करीत होतो तो रद्द झाला आहे. हा करार होण्यासाठी मी माझे सर्वोत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केले होते, परंतु असे असूनही तो करार यशस्वी होऊ शकला नाही. माझा विश्वास आहे की, हे परमेश्वराकडून मिळालेले संकेत आहे, असंही पुनित गोयंका म्हणाले आहेत.