Premium

विश्लेषण : जीडीपी वाढीनं भारत महासत्तेच्या मार्गावर अन् पाकची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर काय बदलले?

India Growth v/s Pakistan Growth Data : पाकिस्तानची जीडीपीची स्थिती चांगली नाही आणि त्यामुळे जीडीपी वाढीचा अंदाज कमी करावा लागणार आहे. पाकिस्तानने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आपला GDP वाढीचा अंदाज २ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा ०.२९ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, असंही पाकिस्तानच्या राष्ट्रीय लेखा समितीने सांगितले.

narendra modi
जीडीपी वाढीमुळे भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं

India Growth v/s Pakistan Growth Data : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज जग जेव्हा या दोन्ही देशांकडे पाहतो तेव्हा त्यात जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था जीडीपी वाढीमुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं चित्र समोर येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला आपला जीडीपी वाढीचा अंदाज कमी करावा लागला आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा वेगाने जात आहे. तर अमेरिकेची अर्थव्यवस्था कर्ज मर्यादेमुळे बेजार झालीय, तर युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीही मंदीमध्ये लोटली गेलीय. त्यामुळे भारताला महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची ही नामी संधी आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या जीडीपी वाढीच्या आकड्यांनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत जीडीपी वाढ ६.१ टक्के राहिली आहे. तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जीडीपी वाढ ७.२ टक्क्यांपर्यंत होती. भारताच्या वाढत्या आकडेवारीने जगाला चकीत केले असले तरी त्याचवेळी शेजारील पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचे अंदाजित आकडे वाढण्याऐवजी कमी करावे लागलेत आणि पाकिस्तानची सरकारी तिजोरी रिकामी झालीय. तर पाकिस्तानातील महागाईचा दर ५५ वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीडीपी म्हणजे काय?

सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीचे आकडे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे वर्णन करतात. देशाच्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप करण्याचा हा एक मार्ग असतो आणि राष्ट्रीय सांख्यिकी संस्था वर्षातून चार वेळा जीडीपीची आकडेवारी जाहीर करते. डेटा खासगी आणि सरकारी गुंतवणुकीचा दर, उत्पादन दर, कृषी विकासदर इत्यादी दर्शवितो. मानवी वैद्यकीय अहवालात हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट इत्यादी तपासून तुम्ही तुमचे आरोग्य कसे तपासता त्याप्रमाणेच हे केले जाते.

भारताचा जीडीपी, चलनवाढीचा दर आणि परकीय चलन साठा

राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने ३१ मे रोजी मार्च तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर केले. जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के आहे. फेब्रुवारीमध्ये मार्च तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज ५.१ टक्के होता, जो १ टक्के बिंदूचा फरक दर्शवितो. आर्थिक वर्ष २०२३ साठी जीडीपी अंदाज ७ टक्क्यांवरून आता ७.२% इतका वाढला. कृषी क्षेत्रातील विकास दर ५.५%, हॉटेल उद्योग ९.१% आणि बांधकाम १०.४% आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचा दर १८.३% आणि उपभोग १३.४ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर सरकारने वित्तीय तूट नियंत्रित करण्याचे लक्ष्य गाठले आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सरकारने ६.४% च्या वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठले आहे, जे मागील वर्षीच्या ६.७१% पेक्षा चांगले आहे. दुसरीकडे भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिल २०२३ मध्ये ४.७ टक्क्यांवर आला. महागाईचा हा आकडा १८ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत भारत मजबूत स्थितीत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा परकीय चलन साठा ५९३.४७७ अब्ज डॉलर आहे.

पाकिस्तानचा जीडीपी, चलनवाढीचा दर आणि परकीय चलन राखीव

पाकिस्तानची जीडीपीची स्थिती चांगली नाही आणि त्यामुळे जीडीपी वाढीचा अंदाज कमी करावा लागणार आहे. पाकिस्तानने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आपला GDP वाढीचा अंदाज २ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा ०.२९ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, असंही पाकिस्तानच्या राष्ट्रीय लेखा समितीने सांगितले. औद्योगिक विकास दरात तीव्र घसरण झाल्यामुळे पाकिस्तानही डिफॉल्ट होण्याची शक्यता आहे. २४ मे २०२३ रोजी लेखा समितीने एक निवेदनही जारी केलंय. पाकिस्तानचा विकासदर मंदीमुळे ठप्प झाला आहे, कृषी क्षेत्रात १.५५%, औद्योगिक क्षेत्रात -२.९४% आणि सेवा क्षेत्रात ०.८६% असा अंदाजित विकासदर आहे. दुसरीकडे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित पाकिस्तानचा महागाई दर एप्रिलमध्ये ३६.४ टक्क्यांसह ५५ वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. अन्नधान्य महागाई दर एप्रिलमध्ये ४८.१ टक्के होता, जो मार्चमध्ये ४७.२ टक्के होता. तसेच पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला मोठा झटका बसला आहे. २६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात १०२ दशलक्ष डॉलरची घट नोंदवली गेली, त्यानंतर ती एकूण ४.०९ बिलियन डॉलरवर आली आहे.

हेही वाचाः विश्लेषण : GDP वाढ ७ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा अंदाज, त्याचा बाजारावर काय परिणाम?

इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी भारताची तुलना कशी?

२०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढत होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) प्रकाशित केलेल्या आकडेवारीच्या आधारे, भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९.१ टक्के दराने वाढ झाली. त्याचप्रमाणे आपण जगभरातील मोठ्या देशांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या काळात ब्राझीलचा विकास दर २.९%, जपानचा १.१%, ब्रिटनचा ४% आणि अमेरिकेचा २.१% होता.

अमेरिकेकडूनही भारताचं कौतुक

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे जगभरातून कौतुक होत आहे. गेल्या १० वर्षांत भारत झपाट्याने बदलला आहे. एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारताने जगात आपले स्थान मजबूत केले आहे. अर्थव्यवस्था आणि बाजाराच्या आघाडीवर भारतातून महत्त्वाचे सकारात्मक परिणाम आले आहेत. २०१३ च्या तुलनेत भारत पूर्णपणे वेगळा आहे, असंही अमेरिकन ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनले रिसर्चने म्हटले आहे.

हेही वाचाः ‘मोदी सरकार सत्तेत असो वा नसो, अदाणी समूहाच्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही,’ राजीव जैन यांचा मोठा दावा

पाकिस्तानात महागाईही गगनाला भिडली

पाकिस्तानातील महागाई गगनाला भिडली आहे. खाण्या-पिण्यापर्यंत सर्व गोष्टींचे भाव येथे उच्च पातळीवर आहेत. पाकिस्तानात एप्रिलमध्ये सर्वाधिक ३६.४ टक्के महागाई दर नोंदवला गेला. त्याचवेळी आयएमएफच्या अटींमुळे या देशाचे चलन आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर गेले होते.

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर

आता पाकिस्तानच्या तिजोरीत मूठभरही पैसा उरलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार, २६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात १०२ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. यामुळे ते ४.०९ बिलियन डॉलरवर घसरले आहेत. चलन साठ्यातील ही घसरण बाहेरील कर्जाच्या थकबाकीमुळे झाली आहे. २६ मेपर्यंत पाकिस्तानकडे एकूण ९.५१३ अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन साठा होता. त्यामुळेच आता पाकिस्तानची अवस्था बिकट होत चालली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 10:22 IST
Next Story
Gold-Silver Price on 5 June 2023: सोने महागले, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव