Girish Kuber’s Analysis On GST Reforms: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत काल ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला मंजुरी देण्यात आली. या नव्या कर रचनेतून १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, या नव्या जीएसटी कर रचनेवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’ या व्हिडीओ मालिकेत परखड भाष्य केले असून, जीएसटी कर रचनेतील हे बदल म्हणजे, “जीएसटीमध्ये जी विकृत अवस्था होती, ती दूर करण्याचा शहाणा प्रयत्न जीएसटी परिषदेने केला आहे”, असे म्हटले आहे.
यावेळी बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, “पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना जीएसटीमध्ये सुसूत्रता आणत त्याचे कर टप्पे कमी करून दिवाळी भेट देऊ असे सांगितले होते. खरे म्हणजे, वस्तू आणि सेवा करांच्या संदर्भात जो काही बदल करायचा असतो, तो बदल जीएसटी परिषद करत असते. पण आपल्याकडे सगळेच वेगळे आहे. पंतप्रधानांनी परस्पर याची घोषणा करून टाकली आणि नंतर झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.”
दडपणाची भावना किंवा परिस्थितीचा रेटा…
ते पुढे म्हणाले की, “आज वर्तमानपत्रांमध्ये आणि सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर सांगितले जात आहे की, या खूप मोठ्या सुधारणा आहेत. मुळात ही भेट आहे का? आणि सुधारणा आहेत का? हे लक्षात घ्यायला हवे. भेट आपण कोणाला कधी देतो किंवा कोणीतरी आपल्याला कधी देते? जेव्हा स्वत:ला काही तरी द्यावेसे वाटत असते तेव्हा. यामागे कुठलीही दडपणाची भावना किंवा परिस्थितीचा रेटा तुम्हाला भेट द्यायला लावत नाही. ही जी काही भेट आहे असे सांगितले जात आहे, ती त्या भावनेने दिली आहे का? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे.”
ट्रम्प वेड्यासारखे वागले नसते तर…
“ही भेट देण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगारलेला आयात कराचा वरवंटा आहे. यामुळे आपल्याला निर्यातीच्या बाबतीत जी आर्थिक हतबलता भेडसावत आहे, त्या नकारात्मकतेला काहीतरी सुखद भावनेचा उतारा असायला हवा, म्हणून ही कथित भेट दिली गेली. याचा अर्थ असा की, डोनाल्ड ट्रम्प वेड्यासारखे वागले नसते तर वस्तू आणि सेवा कराची रचना बदलायची गरज या सरकारला वाटली नसती, हे ठामपणे म्हणता येते. कारण वस्तू आणि सेवा कर जेव्हा अस्तित्वात आला, तेव्हापासून सातत्याने मागणी केली जात आहे की, ही कर रचना विकृत पद्धतीची आहे. वस्तू आणि सेवा कर कधीच असा नसतो”, असेही गिरीश कुबेर यांनी नमूद केले आहे.
शहाणा प्रयत्न
याबाबत अधिक बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, “वस्तू आणि सेवा करातील या बदलांना मोठ्या प्रमाणावरील सुधारणा म्हणता येणार नाहीत. मग आपल्याला याचे वर्णन, आतापर्यंत जीएसटीमध्ये जी विकृतावस्था होती, ती दूर करण्याचा शहाणा प्रयत्न सुधारणांतून केलेला आहे, असे करावे लागेल.”