GST Bachat Utsav Benefits: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नुकत्याच करण्यात आलेल्या जीएसटी २.० सुधारणांवर भाष्य केले.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना, अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे जीएसटी दरांमध्ये सुधारणा करण्यात आली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या जीएसटी सुधारणांचा टॅरिफशी काहीही संबंध नाही. गेल्या दीड वर्षांपासून जीएसटी सुधारणा प्रक्रिया सुरू होती आणि हे पाऊल पूर्वनियोजित धोरणाचा भाग होते.”
त्या पुढे म्हणाल्या की, “गेल्या दीड वर्षांपासून जीएसटीमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कोणीही टॅरिफबद्दल विचार केला नव्हता. मंत्र्यांचे अनेक गट त्यावर सतत काम करत होते. सरकारचे पॅकेज जीएसटी कौन्सिलकडे पाठवण्यात आले होते आणि कौन्सिलने ते संबंधित गटांकडे विचारार्थ पाठवले होते. त्यावर अनेक पातळ्यांवर चर्चा झाली आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही सुधारणा बऱ्याच काळापासून प्रलंबित होती आणि आता ती अंमलात आणण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, जीएसटी २.० मुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतेक कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे रोजगार निर्माण करणाऱ्या एमएसएमईंना फायदा झाला आहे, कारण त्यांच्या उत्पादनांवरील कर कमी करण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर रोजी लागू झालेल्या जीएसटी कपातीनंतर सरकारकडून ५४ वस्तूंवर लक्ष ठेवले जात असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “अशी एकही वस्तू नाही ज्यावर ग्राहकांना कर कपातीचा लाभ मिळाला नाही. जीएसटी कपातीचा अपेक्षेप्रमाणे उच्च दर्जाच्या सिमेंटला फायदा झाला नाही. पण, जीएसटी कपातीनंतर सर्व दूध आणि दुग्ध उत्पादनांच्या किमती कमी झाल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की अशा प्रत्येक वस्तूवरील कर कपातीचा फायदा ग्राहकांना दिला जात आहे.”