LinkedIn CEO On AI Skills For Job: लिंक्डइनचे सीईओ रायन रोसलान्स्की यांनी म्हटले आहे की, भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रतिष्ठित विद्यापीठांमधील पदव्या कदाचित तितक्या महत्त्वाच्या नसतील. त्यांनी म्हटले आहे की, ज्या लोकांकडे एआय कौशल्य आहे व ते जुळवून घेणारे, दूरगामी विचार करणारे आणि शिकण्यास तयार आहेत ते भविष्यात अधिक मौल्यवान असतील. रोसलान्स्की यांनी लिंक्डइनच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयात अलिकडेच झालेल्या फायरसाइड चॅट दरम्यान हे भाष्य केले.
रोझलान्स्की म्हणाले, “भविष्यात ज्यांच्याकडे सर्वात आकर्षक पदवी आहे किंवा ज्यांनी सर्वोत्तम महाविद्यालयांतून शिक्षण घेतले आहे अशांना नव्हे, तर जे लोक जुळवून घेणारे, पुढचा विचार करणारे आणि शिकण्यास तयार असणारे आहेत त्यांना महत्त्व असणार आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, या बदलामुळे अशा संधी उपलब्ध होणार आहेत ज्या आपण यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या. २०२४ च्या मायक्रोसॉफ्ट सर्वेक्षणात असे आढळून आले की, ७१ टक्के कंपन्या अशी कौशल्ये नसलेल्या अनुभवी उमेदवारापेक्षा एआय-कुशल उमेदवाराला प्राधान्य देतील.
लिंक्डइनच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, एआय साक्षरतेची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे सुमारे ७० टक्के वाढ झाली आहे. हा बदल नोकरी बाजारपेठेतील ट्रेंड दर्शवितो, ज्यामध्ये कंपन्या अनुकूलता आणि इतर सॉफ्ट स्किल्सना अधिकाधिक प्राधान्य देत आहेत.
लिंक्डइनच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ करिन किम्ब्रो यांनी कंपनीच्या एआय इन वर्क डे कार्यक्रमात, “लवचिकता हेच नवे चलन आहे”, असे सांगून एआयमुळे नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांच्या अपेक्षा आणि गरजा किती झपाट्याने बदलत आहेत, हे स्पष्ट केले.
कामाच्या ठिकाणी एआयचा उदय झाला असला तरी, लिंक्डइनचे सीईओ रोझलान्स्की असे मानत नाहीत की मशीन्स मानवांची पूर्णपणे जागा घेतील. त्यांचा असा विश्वास आहे की, जे एआय शिकतील ते एआय न शिकणाऱ्यांची जागा घेतील. पण, या नवीन युगात सहानुभूती आणि संवाद यासारख्या परस्पर कौशल्यांचे महत्त्वही ते अधोरेखित करतात. “या सगळ्या बदलांमध्ये ‘मानवी घटक’ हेच बहुतेक लोकांचे गुप्त शस्त्र असणार आहे”, असे रोझलान्स्की म्हणाले.