Maharashtra To Touch 1 Trillion GDP: भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्राचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, असे मॉर्गन स्टॅन्लेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. सध्या राज्याचा जीडीपी ५३६ अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे, जो भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे, तसेच जगातील २८व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या जीडीपी इतका आहे.
महाराष्ट्राने गुंतवणूक, औद्योगिकीकरण, निर्यात, वित्तीय शिस्त, उच्च साक्षरता दर आणि सक्षम व स्थिर नेतृत्व यांच्या संयोगातून हे प्रचंड आर्थिक वाढीचे यश मिळवले आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात म्हटले आहे.
अहवालात असे स्पष्ट केले आहे की, “राज्याची आर्थिक सावधगिरी भारतातील सर्वात कमी कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तरासह स्पष्ट होते. देशाच्या सरासरीपेक्षा उत्पादनात शेतीचा वाटा कमी असूनही महाराष्ट्र अनेक कृषी उत्पादनांमध्ये भारतातील आघाडीचा उत्पादक आहे.”
मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसार, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या चालकांपैकी औद्योगिकीकरण हे प्रमुख चालक असल्याचे म्हटले. गेल्या दशकांमध्ये महाराष्ट्राने आपले लक्ष प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्थेवरून उत्पादन आणि सेवांवर केंद्रित औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे वळवले आहे.
सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक
आर्थिक वर्ष २५ मध्ये एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ३९.२% हिस्सा मिळवणारा महाराष्ट्र, थेट परकीय गुंतवणुकीतही अव्वल आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याला एकूण १९.६ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रांचा देशाच्या जीडीपीमध्ये २२.५ टक्के वाटा आहे. धातू, वाहन, वाहनांचे सुटे भाग, अन्न उत्पादने, पेट्रोलियम, यंत्रसामग्री आणि उपकरणे हे महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनाचा कणा आहेत.
अॅटो हब
महाराष्ट्र हा देशातील वाहन आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे; देशाच्या एकूण उत्पादनात त्याचा वाटा २० टक्के आहे. शिवाय, औषध आणि आरोग्य उपकरणांमध्ये राज्याचा वाटा १६-१७ टक्के आणि कापड उत्पादनात ८ ते १२ टक्के आहे.
महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र
गेल्या दहा वर्षांत, महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रांचा त्याच्या जीडीपीमधील वाटा ७.८ टक्क्यांनी कमी झाला आहे, तर सेवा क्षेत्राचा वाटा याच काळात ९.२ टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा ६४.३ टक्के आहे. राज्य माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, बँकिंग, वित्त, विमा आणि रिअल इस्टेटचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.
सेवा क्षेत्रात महाराष्ट्र ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी आयटी कंपन्यांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. देशातील एकूण ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये महाराष्ट्राचा वाटा ४३ टक्के आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये राज्यातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सची एकूण संख्या ७३० वर पोहोचली आहे.