बहुतेक घोटाळेबाज हे एक तर गरीब होते आणि त्यांनी पैशांच्या हव्यासापोटी गुन्हे केले किंवा गुन्हे झाल्यानंतर त्याची पार्श्वभूमी जेव्हा उघडकीला आली, तेव्हा त्यांना गरीब दाखवले गेले. त्यांच्या पैशांची भूक वाढली, कारण त्या वयात त्यांना हव्या त्या गोष्टी मिळाल्या नाहीत. बर्नी मेडॉफ हासुद्धा त्याचाच पाईक.

लहानपण अतिशय खडतर परिस्थितीत काढताना त्याने मनाशी खूणगाठ बांधली होती की, जगातील सर्वात श्रीमंत माणूस व्हायचे. वर्ष १९३८ मध्ये जन्मलेल्या मेडॉफने वडिलांमुळे लहानपण अतिशय खडतर परिस्थितीत काढले. त्याच्या वडिलांनीसुद्धा स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते आणि ते प्लम्बिंगचे काम करायचे. मेडॉफने कठीण परिस्थितीत लोकांच्या नळांची दुरुस्ती केली आणि समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम केले. पुढे जाऊन वयाच्या २०व्या वर्षी त्याने कायद्याचे शिक्षण सोडून वित्त क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे ठरवले. त्या वर्षी संगणकाचे चांगलेच पेव फुटले होते आणि त्याने ठरवले की, शेअर मार्केटमध्ये याचा वापर करून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना नफा कमावून द्यायचा. वर्ष १९६० मध्ये त्याने स्वतःची कंपनी स्थापन केली ज्यात तो लोकांचे पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग वापरून चांगला परतावा देऊ असे सांगू लागला. त्याच्या शाळेतील मैत्रिणीशी त्याने लग्नसुद्धा केले आणि मग सासऱ्यांनी त्याला आपल्या ओळखीतून पहिले काही चांगले गुंतवणूकदार मिळवून दिले. त्याच्या नवीन संगणकासंबंधित तंत्रज्ञानाने त्याला नवी ओळख दिली आणि वर्ष १९९१ मध्ये तो नॅसडॅकचा चक्क अध्यक्षसुद्धा झाला.

हेही वाचा – Money Mantra : पोर्टफोलियोच्या दौडीसाठी टीसीआय एक्स्प्रेस साथ

हेही वाचा – बाजाररंग : घडामोडींचा काळ आणि बाजारातील उच्चांक

अर्थात त्याने एक अशी योजना सुरू केली होती, ज्याला कित्येक गुंतवणूकदार भाळले आणि या योजनेची तो थेट जाहिरात करत नसे पण वैयक्तिक भेटी किंवा दुसऱ्यांनी दिलेल्या शिफारशीने त्याला नवीन ग्राहक मिळत गेले. त्याचा भाऊ पीटर मेडॉफ हा त्याचा व्यवस्थापकीय संचालक होता. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो कधीही न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर अधिकृत दलाल म्हणून नव्हता तर त्याचे सगळे गुंतवणुकीचे व्यवहार तो दुसऱ्या दलालांकडून करून घ्यायचा. यामुळे त्याची कुठल्याच गोष्टींची कधीच सखोल चौकशी झाली नाही. म्हणूनच नक्की कधीपासून त्याने घोटाळ्याला सुरुवात केली यात मतभिन्नता आहे. कारण पहिल्यापासूनच बाजार वरती गेला की मेडॉफ नफा कमवायचा आणि बाजार खाली आला तरी तो नफा कमवायचा. पण हा फुगा फुटला तो वर्ष २००८ च्या सब प्राईम संकटाने, कारण अर्थात खाली गेलेला बाजार आणि गुंतवणूकदारांना असणारी पैशांची खरी गरज. त्याच्या घोटाळ्याची कार्यपद्धती ऐकली तर असे वाटते की, एवढे मोठे गुंतवणूकदार कसे काय फसू शकतात? बेर्नी मेडॉफने हेसिद्ध केले की, वित्त क्षेत्रात फक्त लहान गुंतवणूकदारच फसतात असे नाही तर मोठे आणि स्वत:ला अतिहुशार समजणारेसुद्धा फसतात. जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी ‘पॉन्झी स्कीम’ तो चालवत होता, पण हे कळायला जगावर आर्थिक अधिराज्य चालवणाऱ्या अमेरिकेला आणि त्यांच्या बाजार नियंत्रकाला तब्बल दोन दशके लागली.