टीसीआय एक्स्प्रेस लिमिटेड (बीएसई कोड: ५४०२१२)

टीसीआय एक्स्प्रेस लिमिटेड ही एक भारतातील आघाडीची एक्स्प्रेस कार्गो लॉजिस्टिक कंपनी आहे. टीसीआय वाहतुकीच्या विविध पर्यायाने आपल्या सेवा पुरवते. कंपनी सरफेस एक्स्प्रेस, डोमेस्टिक एअर एक्स्प्रेस, इंटरनॅशनल एअर एक्स्प्रेस आणि ई-कॉमर्ससारखी लॉजिस्टिक सेवा पुरवते. टीसीआयने रेल्वे सेवा योजना विस्तारित केल्या आहेत. तसेच फार्मा कोल्ड चेन आणि सीटूसी एक्स्प्रेससारख्या नवीन सेवा जोडल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ८५ टक्के क्षमतेचा वापर साध्य केला आहे. ज्यामुळे कॉर्पोरेट आणि एसएमई दोन्ही ग्राहकांकडून मागणी सुधारली. कंपनीच्या ग्राहकांमध्ये विविध उद्योगांचा समावेश असून यात टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उद्योगांचा समावेश आहे. टीसीआय बीटूबी ग्राहकांच्या ९५ टक्के आणि बीटूसी ग्राहकांच्या ५ टक्के सेवा पूर्तता करते.

टीसीआय आपल्या सेवेसाठी तिचे पॅन इंडिया नेटवर्क वापरते. यात २८ क्रमवारी केंद्रे, ५०० एक्स्प्रेस मार्ग, २५०० फीडर मार्ग, ९५० हून अधिक शाखा, ५०,००० पिकअप आणि ६०,००० डिलिव्हरी केंद्रांचा समावेश आहे. वितरण जाळ्याचा भाग म्हणून कंपनी ५००० हून अधिक ट्रकच्या ताफ्यासह भारतातील ९५ टक्केपेक्षा जास्त पिन कोडपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. परंतु महत्त्वाचे म्हणजे कंपनी ॲसेट लाइट मॉडेल वापरत असल्याने हे ट्रक किंवा पिकअप वाहने भाडेतत्त्वावर आहेत.

हेही वाचा – बाजाररंग : घडामोडींचा काळ आणि बाजारातील उच्चांक

गेल्या वर्षी कंपनीने १२५ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाला सुरुवात केली आहे. यात कोलकाता येथे नवीन स्वयंचलित वर्गीकरण केंद्र स्थापन करण्यासाठी, अहमदाबाद येथे जमीन खरेदी करण्यासाठी, गुडगावमधील नवीन कॉर्पोरेट स्थापण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. शिवाय पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रमुख वाढत्या बाजारपेठांमध्ये जाळे विस्तारासाठी ३५ नवीन शाखा कार्यान्वित होतील. कंपनीची येत्या चार वर्षांत उर्वरित ३७५ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आहे. यामध्ये वर्गीकरण केंद्रे तसेच ऑटोमेशन आणि तांत्रिक क्षमता वाढवण्यावर मुख्य भर असेल. टीसीआयची आतापर्यंतची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली आहे. डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने ३१२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढाल तसेच नफ्यात विशेष फरक नसला तरीही या क्षेत्रातील वाढती मागणी, कंपनीच्या विस्तारीकरणाच्या योजना पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव अपेक्षा आहेत. गेल्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळाने २.३५ लाख समभागांच्या २०५० रुपये प्रतिशेअर भावाने समभाग पुनर्खरेदीच्या (बायबॅक) प्रस्तावाला मान्यता दिली होती. सध्या केवळ ७.६७ कोटी रुपयांचे भाग भांडवल, ०.३ बिटा असलेली आणि कुठलेही कर्ज नसलेल्या टीसीआय एक्स्प्रेसचा शेअर ११०० रुपयांच्या आसपास आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून टीसीआय एक्स्प्रेसचा विचार करावा.

हेही वाचा – पॉन्झी म्हणजे काय (कोण) रे भाऊ?

संकेतस्थळ : http://www.tciexpress.in

प्रवर्तक: डी पी अगरवाल

बाजारभाव: १०६५

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : लॉजिस्टिक्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ७.६७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६९.६१

परदेशी गुंतवणूकदार २.९३

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ८.३५

इतर/ जनता १९.११

पुस्तकी मूल्य: रु. १७२

दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश: ४००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३६.१५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०.४

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४५.५

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: १०२

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (आरओसीई): ३२.६%

बीटा: ०.३

बाजार भांडवल: रु. ४२०० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७०१/१०९२

गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.