– लोकसत्ता प्रतिनिधी

नाणी आणि चलनी नोटांविषयी लिहायचे तर कित्येक रंजक गोष्टी आहेत. फक्त भारतातील नाही तर जगातील नाणी व नोटांचा इतिहास व वर्तमान अतिशय मनोरंजक आहे. तुम्ही कधी भारताची नवीन एक रुपयाची नोट बघितली आहे? नीट निरखून पाहा. ही नोट रिझर्व्ह बँकेने जारी केली नसून ती अर्थमंत्रालयाने जारी केली आहे. म्हणजे इतर नोटांप्रमाणे ‘मै धारक को एक रुपया अदा करने का वचन देता हूँ’ असे लिहिलेले आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सहीसुद्धा तुम्हाला दिसणार नाही, तर वित्त सचिवांची सही असणारी ही नोट असते. १९७६ मध्ये वित्त सचिव आणि १९८२ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी हे काम बघितल्यामुळे ते एकटेच असावेत, ज्यांनी दोन्ही प्रकारच्या नोटांवर सही केली. भारतीय नोटांवर १७ भाषांमध्ये नोटेची किंमत लिहिलेली असते. यात मराठी, कोंकणीबरोबरच चक्क नेपाळीसुद्धा असते. नेपाळी ही भारताची राजमान्य भाषादेखील आहे कारण घटनेच्या ८व्या परिशिष्टात तिचा समावेश आहे.

तुम्ही कुठलीही बाजारात मिळणारी ब्रँडेड वस्तू बघितली की, हमखास त्याच्या वेष्टनावर त्याच्या उत्पादकाचे नाव आणि ज्या कारखान्यात उत्पादन झाले त्याचा पत्तासुद्धा असतो. नाणीसुद्धा याला अपवाद नाहीत. कारण तेदेखील उत्पादित केले जातात. फक्त त्या ठिकाणाला कारखाना न म्हणता मिंट किंवा टांकसाळ म्हणतात. अर्थात एवढ्या छोट्या नाण्यावर पूर्ण पत्ता लिहिणे शक्य नसते, त्यामुळे नाण्याच्या पृष्ठभागावर जिथे वर्ष लिहिले असते तिथे अत्यंत छोट्या आकारात एक चिन्ह छापलेले असते. समभुज चौकोन म्हणजे मुंबई, चांदणी म्हणजे हैदराबाद, टिंब म्हणजे नोएडा आणि काहीच नाही म्हणजे कोलकाता टांकसाळ असा त्याचा अर्थ असतो. मला माहीत आहे तुम्ही नक्कीच एखादे नाणे काढून बघाल!

हेही वाचा – BSE-NSE ने दिली आनंदाची बातमी; अदाणींच्या ‘या’ ३ कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना आता होणार फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगातील बहुतेक राष्ट्र त्याच्या विविधतेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सुरक्षा वैशिष्ट्यांशिवाय नोटांवर भरपूर माहिती देतात. आपणदेखील त्याला अपवाद नाही. वेगवेगळ्या नोटा तुम्ही काढून बघितल्यातर तुम्हाला बरेच आकृतिबंध दिसतील. मंगळयान, जंगली प्राणी, हंपी, लाल किल्ला हे तर तसे परिचयाचेच; पण यात उल्लेखनीय म्हणजे ‘रानी की वाव’ हे गुजरातेतील पाटण येथील जागतिक वारसा असणारी बावडी किंवा जिन्यांची विहीर. तेव्हा नुसत्या नोटा बघू नका, त्या खर्च करून जागतिक वारसा असणारी ही सुंदर स्थळेसुद्धा नक्की बघा.