बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी अत्यंत अस्थिर राहिलेल्या मंगळवारच्या व्यवहारांत, दिवसभर बहुतांश काळ नकारात्मक राहिलेल्या बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी शेवटच्या तासाभरात तेल आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या खेरदीने कलाटणी घेत, सकारात्मक उसळी घेतली.

व्याजदरात कपातीच्या निर्णयानंतर चिनी अर्थव्यवस्थेबद्दल वाढलेल्या चिंतेचे प्रतिबिंब पडून भांडवली बाजारात मंगळवारच्या व्यवहारांची सुरुवात सावधपणे झाली. अत्यंत त्रोटक पट्ट्यात हालचाल सुरू राहिलेल्या सेन्सेक्सने सत्राची सांगता मात्र १५९.४० अंश (०.२५ टक्के) वाढीसह ६३,३२७.७० या पातळीवर केली. प्रारंभिक सत्रात घसरणीने सेन्सेक्स ६३ हजारांखाली, ६२,८०१.९१ च्या नीचांकावर रोडावला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.२५ अंशांनी (०.३३ टक्क्यांनी) वाढून १८,८१६.७० वर दिवसअखेरीस स्थिरावला.

हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

सेन्सेक्सधून टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड, टेक महिंद्र, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस हे प्रमुख समभाग वधारले. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक हे समभाग मात्र पिछाडीवर होते.

हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

व्यापक बाजारपेठेत मात्र खरेदीपूरक वातावरण होते. याचा प्रत्यय म्हणजे बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हे मंगळवारच्या व्यवहाराचा शेवट हा अनुक्रमे ०.४७ टक्के आणि ०.४० टक्क्यांच्या वाढीसह केला. जगभरात इतर बाजार मात्र नरमलेलेच होते. आशियाई बाजारांमध्ये टोक्योचा अपवाद केल्यास, सोल, शांघाय आणि हाँगकाँग बाजारांचे निर्देशांक नकारात्मक बंद नोंदवला. स्थानिक वेळेनुसार मध्यान्हानंतर खुले झालेले युरोपातील भांडवली बाजार बहुतांश घसरणीत होते.