प्रमोद पुराणिक

तीस वर्षे पूर्ण करणारी टाटा एएमसी म्युच्युअल फंड उद्योगात पंजाब मेल कधीच होऊ शकली नाही. ती पॅसेंजर ट्रेनच राहिली. हे घडण्याची कारणे काय यांचे सखोल विश्लेषण होऊ शकते. परंतु या ट्रेनला आता नवीन चालक मिळाला आहे. यापुढे तिचे वंदे भारत ट्रेनमध्ये परिवर्तन होईल, अशी आशा आहे.

प्रथित भोबे यांनी टाटा म्युच्युअल फंड घराण्याला १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून १.५० लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारे म्युच्युअल फंड घराणे म्हणून पुढे आणले. त्यामुळे आता त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता लवकरच २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा गाठेल, असे वाटू लागले आहे. प्रथित भोबे टाटा म्युच्युअल फंडमध्ये मे २०१८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यांचा एकूण २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ११ वर्षे आयसीआयसीआय बँकेमध्ये त्यांनी ज्येष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय यांचासुद्धा त्यांना चांगला अनुभव आहे. ८ वर्षे त्यांनी सिटी बँकेचा वितरण व्यवसाय सांभाळला. जे टाटा म्युच्युअल फंडाला आता जमले, ते अगोदर का जमू शकले नाही? याची अनेक कारणे सांगून विश्लेषण करता येईल. परंतु तो इतिहास मागे टाकायचा आणि पुढे जायचे. इतर व्यवसायाकडे टाटा उद्योग समूहाचे जेवढे लक्ष होते, तेवढे म्युच्युअल फंड व्यवसायाकडे नव्हते. सुरुवातीला टाटा म्युच्युअल फंडाची स्थापना झाली तेव्हा यूटीआयमधून निवृत्त झालेले कार्यकारी विश्वस्त के. एन आत्मारामाणी यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यांची युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेत चांगली कामगिरी होती. टाटांची सुरुवात चांगली झाली. परंतु पुढे विशेष काही घडले नाही. वेदप्रकाश चतुर्वेदी यांची कारकीर्द उत्कृष्ट झाली. टाटा म्युच्युअल फंड घराण्याने इंड बँक ८८ए ही प्राप्तिकर बचतीची फक्त ५ कोटी रुपयांची मालमत्ता असलेली योजना विकत घेतली. चतुर्वेदी यांनी त्या योजनेचे नाव बदलले. टाटा इक्विटी अपॉर्च्युनिटीज असे नाव दिले. या योजनेत लाभांश वाटपाचा एवढा वर्षाव केला की, ५ कोटी रुपये मालमत्तेची योजना ७५० कोटी रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर मात्र चतुर्वेदी यांनी एकामागोमाग एक इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यास सुरुवात केली. या योजनांचा एवढा अतिरेक झाला की, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर या नावानेसुद्धा योजना आणली गेली. एकदा एका कार्यक्रमात त्यांना गमतीने म्युच्युअल फंड व्यवसायातील मनमोहन देसाई असेदेखील म्हटले गेले. यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर योजना सर्वच म्युच्युअल फंडाच्या कोसळल्या. त्यानंतर आलेले संजय सचदेव यांचे प्रयत्न अपुरे पडले. या ठिकाणी आपल्याला प्रथित भोबे यांच्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारताना पार्श्वभूमी किंवा इतिहास काय होता, याचा थोडक्यात उल्लेख केला. त्यांनासुद्धा सुरुवातीला अनेक अडचणीशी सामना करावा लागला. फंड मॅनेजर सोडून जाणे हा प्रकार सर्वच म्युच्युअल फंडाकडे घडत असतो. परंतु टाटांकडे तो जास्त प्रमाणात होता.

हेही वाचा >>>Money Mantra : पोर्टफोलियोच्या दौडीसाठी टीसीआय एक्स्प्रेस साथ

टाटांकडे आल्यानंतर प्रथित भोबे नाशिकला आले असताना, खूपच कडक शब्दांत खटाखटी नाइलाजाने घडल्या होत्या. परंतु त्यांचा कुठेही डोक्यात त्यांनी राग ठेवला नाही. उलट टीका मान्य करून काय करता येईल यांच्या योजना आखण्यास सुरुवात झाली. प्रथम टाटा म्युच्युअल सर्व योजना असणे आवश्यक होते. त्यानुसार भोबे यांनी एकामागोमाग एक सर्व प्रकारच्या योजना आणल्या. डिव्हिडंड यील्ड योजना विलीन करून काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा नव्याने आणणे हा प्रकार मात्र कोणालाच आवडला नाही. सर्व योजना जेव्हा चांगली प्रगती दाखवू लागल्या, तेव्हा मालमत्ता वाढवण्यास मदत झाली. भोबे यांचा या क्षेत्राचा संपर्क कामी आला. बँकांनी टाटा म्युच्युअल फंडानी आणलेल्या विविध योजना गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यास सुरुवात केली. लाभांशाला प्राप्तिकर लागल्याने गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीकडे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले. वास्तविक पाहता म्युच्युअल फंड उद्योगात टाटा हायब्रिड इक्विटी फंड ही पहिली योजना होती की, ज्या योजनेने २०१० पासून नियमित लाभांश वाटप करण्यास सुरुवात केली. टाटा इक्विटी पीई या फंडाने तर या व्यवसायात ५ टक्के आणि १० टक्के ट्रिगर ही संकल्पना प्रथम आणून ती यशस्वी करून दाखविली. तीदेखील व्हॅल्यू फंड असलेल्या योजनेमध्ये हे करता आले. क्वॉन्ट फंड चालला नाही. लहान मुलांसाठी असलेली टाटा यंग सिटिझन फंड ही योजना एचडीएफसी चिल्ड्रन गिफ्टसारखे यश मिळवू शकली नाही. परंतु मल्टिॲसेट, स्मॉल कॅप, मल्टिकॅप फंड यांनी चांगले यश मिळवले.

प्रथित भोबे हे पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी. कॉम.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी एमएमएस झाले. पुढील महिन्याच्या १८ तारखेला ५३ वर्षे पूर्ण करून ५४ व्या वर्षांत ते पदार्पण करतील . टाटा म्युच्युअल फंड या वेगाने वाढला तर त्याला पहिल्या पाचमध्ये येणे अशक्य नाही. कारण टाटा या नावाला जो विश्वास आहे, तो कोणाला मिळवता येणार नाही. मालमत्ता वाढली म्हणजे तो फंड चांगला असे नसून विश्वासपात्र असलेला फंड हे बिरुद जास्त चांगले.

लेखक नाशिकस्थित अर्थअभ्यासक आहेत.