जागतिक पातळीवरील मंदीसदृश परिस्थिती आणि त्यापरिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात धातू, वित्त आणि तेल वितरण कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये बुधवारच्या सत्रात दोन शतकी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०८.०१ अंशांनी घसरून ६१,७७३.७३ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने कमकुवत पातळीवरून सुरवात केली, मात्र दुपारच्या सत्रात किंचित सावरून त्याने ६२,१५४.१४ अंशांची उच्चांकी पातळी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर युरोपियन बाजारातील घसरणीचे पडसाद उमटल्याने सेन्सेक्सने सत्रात ६१,७०८.१० अंशांची नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६२.६० अंशांची घसरण झाली आणि तो १८,२८५.४० पातळीवर स्थिरावला. अदाणी एंटरटेनमेंट, अदाणी पोर्ट्स आणि टाटा मोटर्सच्या समभागात घसरण झाल्याने निफ्टीतील घसरण अधिक वाढली. देशांतर्गत भांडवली बाजारात अल्पकालावधीसाठी तेजीचा अनुभव आला, जो जागतिक बाजारातील मंदीमुळे झाकोळला गेला. अमेरिकेतील कर्ज पेचाची परिस्थिमुळे रोख्यांवरील परताव्याचा दर वाढला आहे. तसेच दुसरीकडे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता कमी झाली आहे. गुंतवणूकदार अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या बैठकीकडे लक्ष लावून आहेत, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls 200 degrees as investors take profits vrd
First published on: 24-05-2023 at 17:54 IST