मुंबई : देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारच्या सत्रात प्रत्येकी एक टक्क्यांनी वधारले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयटीसी या दिग्गज कंपन्यांच्या समभागांमधील चौफेर खरेदीने बाजाराला बळ दिले. रिझर्व्ह बँकेकडून २.६९ लाख कोटींचा विक्रमी लाभांश आणि अमेरिकी रोख्यांवरील परतावा कमी होण्याच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सप्ताहसांगतेच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७६९.०९ अंशांनी म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी वधारून ८१,७२१.०८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ९५३.१८ अंशांची कमाई करत ८१,९०५.१७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र या तेजीमय सत्रात सेन्सेक्स ८२,००० अंशांची पातळी गाठण्यास अपयशी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४३.४५ अंशांनी ( ०.९९ टक्के) वधारला आणि तो २४,८५३.१५ पातळीवर बंद झाला. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स ६०९.५१ अंशांनी तर निफ्टी १६६.६५ अंकांनी अंशांनी घसरला.

देशांतर्गत भांडवली बाजार सरलेल्या आठवड्याच्या सुरूवातीला दिसलेल्या तोट्याला जवळपास निम्म्याने भरून काढण्याइतके सावरले आहेत. मुख्यतः ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या समभागांमधील वाढीने आधीचे नुकसान भरून काढता आले. मान्सूनच्या सरी देखील सामान्यपेक्षा अधिक बरसण्याच्या अंदाजामुळे ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राला फायदा झाला, तर सकारात्मक तिमाही आर्थिक कामगिरीने आयटी समभागांमध्ये तेजी दिसून आली.

रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला विक्रमी लाभांश हस्तांतरणामुळे, केंद्राची वित्तीय तूट कमी होण्याची आशा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, इटर्नल, पॉवर ग्रिड, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे, शुक्रवारच्या सत्रात एकमेव सन फार्माचा समभाग २ टक्क्यांनी घसरला. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५,०४५.३६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली होती.

सेन्सेक्स ८१,७२१.०८ ७६९.०९ ०.९५%

निफ्टी २४,८५३.१५ २४३.४५ ०.९९%

तेल ६४.२९ -०.२३%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.२५ -७० पैसे