Share Market Updates: भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना दिलेल्या जबरदस्त प्रत्युतरानंतर झालेल्या शस्त्रविरामाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजार आज मोठ्या तेजीसह उघडला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १३४९ अंकांच्या वाढीसह ८०,८०३ वर उघडला. बाजार उघडताच बाजारात मोठी खरेदी दिसून आली.
सकाळी १० वाजता सेन्सेक्स २.४७ टक्क्यांनी किंवा १९५२.९१ अंकांनी वाढून ८१,४०७.३८ वर पोहोचला होता. सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्स वधारले असून १ शेअर घसरला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात २.९० टक्के किंवा ६९६.४० अंकांच्या वाढीसह २४,७०४.४० वर व्यवहार करताना दिसला.
सेन्सेक्समधील या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्समधील अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक ४.४३ टक्के वाढ झाली आहे. यानंतर, अॅक्सिस बँक ३.७० टक्के, बजाज फायनान्स ३.५३ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.४४ टक्के, झोमॅटो ३.४१ टक्के, पॉवरग्रिड ३.२४ टक्के, लार्सन अँड टुब्रो ३.४८ टक्के, एनटीपीसी ३.२६ टक्के, रिलायन्स ३.०१ टक्के, टाटा स्टील २.८० टक्के, इन्फोसिस २.७५ टक्के, एचडीएफसी बँक २.७३ टक्के, कोटक बँक २.५६ टक्के, एसबीआय २.२८ टक्के आणि टीसीएस २.०४ टक्के वधारले आहेत. दरम्यान ही आकडेवारी सकाळी दहा वाजेपर्यंतची आहे.
निफ्टी रिअल्टी जोमात
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी रिअल्टीमध्ये सर्वाधिक ५.२१ टक्के वाढ दिसून आली. याशिवाय, निफ्टी प्रायव्हेट बँक ३.०५ टक्के, निफ्टी पीएसयू बँक २.७५ टक्के, निफ्टी मेटल ३.५६ टक्के, निफ्टी मीडिया २.५४ टक्के, निफ्टी आयटी २.४४ टक्के, निफ्टी एफएमसीजी १.५८ टक्के, निफ्टी ऑटो २.१५ टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स २.८६ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस २.८४ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर ०.१३ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ३.९० टक्के वधारले. याशिवाय, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स १.३८ टक्क्यांनी आणि निफ्टी फार्मा २.१० टक्क्यांनी घसरला आहे. ही आकडेवारी सकाळी दहावाजेपर्यंतची आहे.
चीन-अमेरिका करारामुळे भारतीय शेअर बाजार सकारात्म
आठवड्याच्या अखेरीस अमेरिका आणि चीन त्यांचे दीर्घकालीन व्यापार मतभेद सोडवण्यासाठी पुढे सरकत असल्याचे दिसून आल्याने बाजारात आशा निर्माण झाली आहे. स्वित्झर्लंडमधील चर्चेनंतर दोन्ही देशांनी आशावाद दर्शविला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी दोन्ही देशांतील बैठका अत्यंत सकारात्मक होत असल्याचे म्हटले आहे. तर चीनचे उपपंतप्रधान हे लाइफेंग यांनीही चर्चे पुढे जात असल्याचे सांगितले.