Share Market Crash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी (१ फेब्रुवारी) चीन, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लादण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. यानंतर, कॅनडाचे हंगामी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

आज (सोमवारी), आशियाई बाजार उघडताच, त्यात मोठी घसरण दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक २.५% ने घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ३% ने घसरला आहे.

भारतीय शेअर बाजारावरही परिणाम

तैवानच्या शेअर बाजारामध्येही ३.५% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकातही २% पेक्षा जास्त घसरण दिसून आली. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियन शेअर बाजारावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. अमेरिकन फ्युचर्समध्येही मोठी घसरण आली आहे. डाऊ फ्युचर्स ५५० अंकांनी घसरून व्यवहार करत आहे. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, बाजार उघडताच सेन्सेक्स ६७८.०१ अंकांनी घसरून ७६,८२७.९५ अंकांवर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी २०७.९० अंकांनी घसरून २३,२७४.२५ अंकांवर पोहोचला होता.

कमोडिटी बाजारात पडझड

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही पडझड होत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, ते प्रति बॅरल ७६ डॉलर्सच्या पुढे गेले आहे. चलन बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, डॉलर निर्देशांक देखील १% पेक्षा जास्त वाढून १०९.७७ वर पोहोचला आहे.

महागाई वाढण्याची चिन्हे

अमेरिका दरवर्षी कॅनडा, मेक्सिको आणि चीनसोबत १.६ ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार करते. सध्या, या टॅरिफ वॉरला फक्त कॅनडाकडून प्रत्युत्तर मिळाले आहे. मेक्सिको आणि चीनने अद्याप कोणताही निर्णय घेण्याची घाई केली नाही. कॅनडाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम अमेरिकेने आणि आता कॅनडाने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या आयात शुल्क लादण्याच्या (टॅरिफ) घोषणेनंतर, दोन्ही देशांमध्ये तसेच जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये अनेक वस्तूंच्या किमती वाढतील. कार आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंतच्या वस्तूंवर यारे परिणाम होण्याची शक्यता आहे.