Market roundup: भारताच्या शेअर बाजाराने बुधवारी (५ फेब्रुवारी) नकारात्मक वळण घेतले आणि दिवसाची अखेर निफ्टी निर्देशांकाने २३,७०० खाली, तर बीएसई सेन्सेक्सने ३१३ अंशांच्या नुकसानीसह केली. जागतिक बाजारात सर्वत्र थांबा आणि वाट पाहा अशा सावध कलाची छाया तोच कित्ता भारतीय शेअर बाजारांनी गिरवल्याचे दिसून आले.

संपूर्ण दिवसभर अत्यंत निमुळत्या पट्ट्यात हालचाल सुरू राहिलेल्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांतील घसरण मुख्यतः दुपारी २ नंतर शेवटच्या दीड तासांत वाढत गेली. निर्देशांकांत सामील आघाडीच्या समभागांमध्ये विक्रीचा जोर वाढल्याचे प्रामुख्याने दिसून आले. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स ३१२.५३ अंशांच्या नुकसानीसह, ७८,२७१.२८ या पातळीवर स्थिरावला. निफ्टी निर्देशांक ४२.९५ अंशांच्या तोट्यासह २३,६९६.३० वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.४० टक्के आणि ०.१८ टक्के अशी घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स १.८१ टक्क्यांनी म्हणजेच १,३९७.०७ अंशांनी वधारून ७८,५८३.८१ या महिन्याच्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला होता. तर निफ्टीने १.६२ टक्क्यांची म्हणजेच ३७८.२० अंशांची भर घातली आणि तो २३,७३९.२५ पातळीवर पोहोचला होता. दोन्ही निर्देशांकांची ३ जानेवारीनंतर ही उच्चांकी पातळी गाठली होती.

बुधवारच्या शेअर बाजारातील व्यवहारांचे वैशिष्ट्य म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी हे प्रमुख निर्देशांक नकारात्मक बंद नोंदवला असताना, बाजारातील मधल्या व तळच्या फळीतील समभागांमध्ये खरेदीला जोर होता. त्यामुळे बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक तब्बल १.६२ टक्क्यांनी, तर बीएसई मिडकॅप निर्देशांकाने ०.६९ टक्क्यांची कमाई केली.

शेअर बाजाराच्या सावध पवित्र्याची तीन कारणेः

ट्रम्प धोरणासंबंधी अनिश्चितता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरील वाढीव व्यापार शुल्क लादण्याचा निर्णय एक महिन्याने लांबवल्याने त्याचे सुपरिणाम भांडवली बाजारावर मंगळवारच्या सत्रात उमटले. तथापि चीनने अमेरिकेच्या कर लादण्याच्या निर्णयावर जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या रडारवर आणखी नवनव्या आक्रमक घोषणा दिवसागणिक पुढे येत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांमध्ये या घोषणांच्या परिणामांवर आणि ट्रम्प यांच्याकडून जागतिक व्यापार संतुलनात बिघाडाच्या दृष्टीने संभाव्य पावलांवर बारकाईने लक्ष असल्याचे बुधवारच्या सावध व्यवहारांनी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँक व्याजदर धोरणः

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर-निर्धारण समितीची बैठक (५-७ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. मध्यवर्ती बँक व्याज दरात कपात करेल आणि चार वर्षांहून अधिक काळातील ही पहिलीच कपात ठरेल, अशी बहुतांश विश्लेषकांची अपेक्षा आहे. तरी ट्रम्प यांचे निर्णय आणि त्याचे जागतिक पुरवठा साखळीला बाधा आणणारे परिणाम हे चलनवाढीला चालना देणारे ठरतील. हे पाहता व्याजदर कपात केली जाईल की ती एप्रिलपर्यंत लांबणीवर पडेल, अशी साशंकताही आहे. बैठकीतील मंथनातून पुढे येणारा निर्णय शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा जाहीर करतील. सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे जर कपात झाली तर त्याचे बाजारात उत्साही स्वागत होईल. त्याचवेळी अपेक्षाभंगाची भयंकर नकारात्मक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आठवड्यात एकूण ७४८ कंपन्या त्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न कामगिरी जाहीर करत आहेत. लक्षणीय कंपन्यांमध्ये एशियन पेंट्सचा निकाल बाजाराच्या पसंतीस उतरला नाही आणि शेअरचा भाव बुधवारी साडेतीन टक्क्यांनी आपटण्यासह, हा निर्देशांकातील सर्वात वाईट कामगिरी करणारा समभाग ठरला. बाजाराच्या दृष्टीने संवेदनशील ठरणाऱ्या कंपन्यांचे निकाल गुरुवारी आणि शुक्रवारी देखील नियोजित आहेत. शिवाय, एनएचपीसी, ऑइल इंडिया या सरकारी कंपन्यांच्या अंतरिम लाभांशांचे प्रमाण देखील शेअरधारकांसाठी उत्सुकतेचे असतील.