पॉन्झीने एक आयात-निर्यात संबंधीचे नियतकालिक सुरू केले, अर्थातच ते चालले नाही. पण त्याला एक गोष्ट कळली की, युरोपमधून एक ‘इंटरनॅशनल रिप्लाय कुपन’ अमेरिकेत आणले जाऊ शकते. म्हणजे अमेरिकेतील माणसाला युरोपमध्ये पत्र पाठवायचे असेल तर हे कुपन वापरून तो स्वस्तात पाठवू शकत असे आणि जर त्याला पत्र पाठवणाऱ्या माणसाने हे कुपन दिले असेल तर फुकटातच काम होईल. म्हणजे युरोपात ते विकत घ्यायचे आणि अमेरिकेत विकायचे आणि नफा कमवायचा. लोकांना त्याने हा आपला धंदा असल्याचे सांगून पैसे घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना व्याज देण्याचे कबूल केले. खरेतर हा एक कायदेशीर आणि नैतिक उद्योग होता. याला आर्बिट्राज असे देखील संबोधले जाऊ शकते. यासाठी त्याने एक कंपनी स्थापन केली आणि ५० टक्के परतावा तोसुद्धा ९० दिवसांत अशी योजना सुरू केली. पहिल्या काही दिवसांमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना त्याने पैसे परत देखील दिले. काही महिन्यांनंतर तो इतका प्रसिद्ध झाला की, त्याच्याकडे कोट्यवधी रुपये जमा झाले. त्याला लोक विझार्ड किंवा आर्थिक जगतातील जादूगार म्हणू लागले. बोस्टन पोस्ट या वृत्तपत्राने त्याची तशी बातमीसुद्धा छापली आणि मग काय लोक अक्षरशः पैसे घेऊन त्याच्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावून पैसे गुंतवण्यास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै १९२० पर्यंत त्याने १५ दशलक्ष डॉलर एवढी गुंतवणूक मिळवली. मात्र अपेक्षित होते तसेच घडले आणि बोंबाबोंब झाली. पुढे या प्रकरणावरून त्याची चौकशी देखील झाली. त्याच्याविरुद्ध लिहिणाऱ्याच्या विरोधात त्याने अब्रूनुकसानीचे दावे दाखल केले. कॅलॅरेन्स बरें या पत्रकाराने शोधपत्रिका करून हे सिद्ध केले की, एवढे इंटरनॅशनल रिप्लाय कुपन अमेरिकेत चलनात असूच शकत नाही, जेवढ्याचे पैसे लोकांनी पॉन्झीच्या कंपनीत गुंतवले होते. अजून काही दिवसांनी त्याच बोस्टन पोस्टने कॅनडातील तुरुंगातील माहिती छापली. मग काय त्याच्या कार्यालयाच्या बाहेर परत रांग लागली पण ती पैसे परत मिळवण्यासाठी. त्यानेसुद्धा काहींचे पैसे परत केले आणि बँकेकडून कर्ज घेऊन किंवा ओव्हरड्राफ्ट घेऊन तो परतफेड करत होता. तो इतका दिलदार होता की, खोट्या ठेवींचे प्रमाणपत्र घेऊन येणाऱ्यांनासुद्धा तो पैसे देत असे.

हेही वाचा – Money mantra: वित्तरंजन:‘पॉन्झी’ म्हणजे काय (कोण) रे, भाऊ? (भाग १)

हेही वाचा – Money Mantra : फंड विश्लेषण: एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड

अर्थात हे फार दिवस चालले नाही आणि अखेरीस त्याने दिवाळखोरी जाहीर केली. त्यामुळे सहा बँकासुद्धा बुडाल्या आणि गुंतवणूकदारांचे सुमारे ७ दशलक्ष डॉलरही. पॉन्झीला शिक्षा झाली आणि काही वर्षे जेलमध्ये काढल्यानंतर बाहेर आल्यावर त्याने पुन्हा एक २०० टक्के परतावा देणारी योजना काढली आणि फारसे यश न मिळताच पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली. तिथून बाहेर आल्यावर तो इटलीला गेला, म्हणजे त्याला अमेरिकेने हाकललाच आणि तिथे त्याने काही नोकऱ्या केल्या. शेवटच्या दिवसात तो ब्राझील येथे रिओ डे जेनेरिओ येथे स्थायिक होता आणि आपली कथा लोकांना विकण्याचा प्रयत्न करत होता. अतिश्रीमंतीचे दिवस बघितलेला पॉन्झी अखेरीस जानेवारी १९४९ मध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत निधन पावला. तरीही पुढील कित्येक दशके आणि एक शतक उलटून गेले तरी आपले नाव अजरामर करून गेला पण फक्त ‘पॉन्झी स्कीम’ म्हणून!

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is ponzi and who is he print eco news ssb
First published on: 06-03-2024 at 12:48 IST