Mumbai Tops In Mutual Fund Investment: भारतातील म्युच्युअल फंड उद्योग सातत्याने नवीन उंची गाठत आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण असेट अंडर मॅनेजमेंट (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) ७५.६१ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. यामध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक असून, फ्रँकलिन टेम्पलटनच्या अहवालानुसार म्युच्युअल फंडांच्या असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये मुंबईचे योगदान २०.५४ लाख कोटी रुपये आहे.

या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की, इक्विटीसह इतर गुंतवणुकींप्रमाणेच मुंबई देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीचेही केंद्र आहे. गेल्या वर्षभरातच मुंबईचे असेट अंडर मॅनेजमेंट १६.५ लाख कोटी रुपयांवरून २०.५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशातील म्युच्युअल फंडातील असेट अंडर मॅनेजमेंट सप्टेंबर २०२५ मध्ये ७५.६१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला ६७.०९ लाख कोटी रुपये होते. गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगात २३ टक्के सीएजीआरने (कंपाउंड अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट) वाढ झाली आहे.

मुंबई-दिल्लीचा वाटा जवळपास निम्मा

देशातील एकूण म्युच्युअल फंडातील असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये मुंबई आणि दिल्लीचा वाटा ४०% पेक्षा जास्त आहे. याचबरोबर अहमदाबाद आणि जयपूर सारख्या शहरांमध्येही गुंतवणुकीत झपाट्याने वाढ होत आहे. अहमदाबादने चेन्नईला मागे टाकत सहावे स्थान गाठले आहे.

एसआयपी गुंतवणूकदारांमध्येही मोठी वाढ

भारतातील एसआयपी गुंतवणूकदारांची संख्याही वेगाने वाढत आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत एसआयपीमधील एकूण असेट अंडर मॅनेजमेंट १५.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, ज्यामध्ये ९.७३ कोटी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. केवळ सप्टेंबर महिन्यातच ५७.७३ लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत. याचबरोबर गेल्या महिन्यात एसआयपीद्वारे झालेली नवीन गुंतवणूक २९,३६१ कोटी रुपये होती.

एसआयपीमध्ये सर्वाधिक योगदान महाराष्ट्राचे

देशातील एसआयपी गुंतवणुकीत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांचे योगदान सर्वाधिक आहे. यात हरियाणा आणि राजस्थान या राज्यांतील एसआयपी गुंतवणुकीतही वेगाने वाढ होत आहे. तर उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा देखील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहेत.

मुंबई ही निश्चितच भारताची म्युच्युअल फंड राजधानी आहे. पण त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे जयपूर, भोपाळ, चंदीगड आणि अहमदाबाद सारख्या शहरांतूनही आता म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. यावरून स्पष्ट होते की म्युच्युअल फंड गुंतवणूक आता मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण भारतात विस्तारत आहे.