गेल्या काही आठवड्यांपासून लसूणाचे भाव गगनाला भिडले आहेत. देशभरात लसूणाची किरकोळ किंमत रु. २५०-३५० /किलो इतकी आहे, जी गेल्या वर्षी सुमारे रु. ४०/किलो इतकी होती. तर तीन महिन्यांपूर्वी याच लसूणाचा भाव सुमारे १५० रुपये किलो होता. या वाढत्या किमतीने ग्राहकांना घाम फुटला आहे. त्यामुळेच लसूणाच्या वाढत्या किमती मागे नक्की काय कारणे असू शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

लसूणाच्या किमती का वाढल्या?

किरकोळ आणि घाऊक बाजारात लसूणाच्या किमतीत सातत्याने वाढ होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पिकाचे नुकसान आणि पिकाची कापणी उशिराने होणे हे आहे. लसूण हे पीक खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानमधील उत्पादक खरीप पीक घेतात, या भागात लागवड जून-जुलै दरम्यान केली जाते आणि कापणी सप्टेंबरनंतर केली जाते. रब्बी पिकाची लागवड सप्टेंबर -नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि मार्चनंतर कापणी केली जाते. या वर्षी खरीप पीक काढणीला उशीर झाल्याने भावात वाढ झाली आहे. मध्य प्रदेश हा लसूणाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. या वर्षी, मान्सूनच्या संथ प्रगतीमुळे मध्य प्रदेश आणि इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये लसूणाची लागवड होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरऐवजी नोव्हेंबरच्या अखेरीसच खरीपाचे पीक बाजारात येऊ लागले आहे. त्यामुळेच पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरीसच पूर्ण आवक सुरू होईल, असे प्राथमिक चित्र आहे.

अधिक वाचा: हायड्रोजनेटेड तेल म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहे का?

लसूणाची किमंत आणि मध्यप्रदेश

पुण्याच्या घाऊक बाजारात काम करणारे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील पीक येण्यास उशीर झाल्यामुळे देशभरात लसूणाचे भाव वाढले आहेत. “एका बाजूला आवक कमी असल्याने आणि दुसऱ्या बाजूला मागणी जास्त असल्याने किमती वाढल्या आहेत,” असे ते म्हणाले. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये लसूणाची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि तिथेच लसूणाची किंमत ठरते. सध्या, लसूणाचा भाव १४५.५० रुपये/किलो दराने आहे, जो २० डिसेंबर २०२२ रोजी १२.५० रुपये/किलो होता.

हा ट्रेण्ड किती दिवस राहणार?

भुजबळ आणि मंदसौरमधील व्यापाऱ्यांनी तत्काळ किंमत सुधारण्याची शक्यता नाकारली. जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ किंमत रु. २५०-३५०/ किलोच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मंदसौरच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, खरीप पीक काढणीच्या विविध टप्प्यात आहे आणि नवीन पिकाची आवक सुधारेल तेव्हाच भाव सुधारतील. तो पर्यंत वाट पाहावी लागेल.

अधिक वाचा: इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रब्बी पिकावर परिणाम होणार का?

सध्या लसूणाला मिळणारा चांगला भाव पाहता रब्बी पिकाचे नियोजन करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढवण्याचा मोह होईल. मात्र, जमिनीतील ओलावा नसणे हा यासाठी मोठा अडथळा ठरणार आहे. सर्वसाधारणपणे रब्बीचे क्षेत्र सुमारे तीन टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक राज्यांमध्ये आर्द्रतेचा ताण पाहता लसूणाचे एकरी क्षेत्र कमी होणार असल्याचाही बाजाराचा अंदाज आहे. उन्हाळी पीक साधारणपणे शेतकरी साठवून ठेवतात आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला कमी उपलब्धतेमुळे किमतींवर काही काळ दबाव राहील अशी अपेक्षा आहे.