Impact Of US Additions 25% Tariffs On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारतावर लादलेले २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त २५% टॅरिफ लादले होते, जे आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू झाले आहे.

दरम्यान ट्रम्प यांनी लादलेल्या या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे. याचा भारतातील अनेक क्षेत्रांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि हजारो नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. अमेरिकन बाजारपेठेत कापड, रत्ने आणि दागिने, कोळंबी, कार्पेट आणि फर्निचर यासारख्या कमी मार्जिन असलेल्या भारतीय वस्तूंची निर्यात जास्त आहे.

पाकिस्तान, चीनला होऊ शकतो फायदा

दरम्यान, व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया अगदी चीन आणि पाकिस्तान (ज्यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सध्या कमी कर लादले आहेत) सारख्या स्पर्धकांना फायदा होऊ शकतो.

निर्यात ४९.६ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरण्याची शक्यता

ट्रम्प यांनी लादलेल्या या अतिरिक्त २५ टक्के टॅरिफमुळे, व्यापार तज्ञांचा अंदाज आहे की भारताच्या अमेरिकेतील निर्यातीचे मूल्य २०२५-२६ (आर्थिक वर्ष २६) मध्ये आर्थिक वर्ष २०२५ च्या पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. थिंक-टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या विश्लेषणानुसार, भारताची अमेरिकेतील उत्पादन निर्यात आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४९.६ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरू शकते, जी मागील आर्थिक वर्षात सुमारे ८७ अब्ज डॉलर्स होती. कारण भारताच्या अमेरिकेतील निर्यातीपैकी दोन तृतीयांश निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ आकारला जाईल, ज्यामुळे काही उत्पादनांवरील टॅरिफ ६० टक्क्यांहून अधिक होईल.

३० टक्के निर्यात टॅरिफमुक्त

अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीपैकी सुमारे ३० टक्के निर्यात (आर्थिक वर्ष २५ मध्ये २७.६ अब्ज डॉलर्स) टॅरिफमुक्त राहील कारण औषधनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या उत्पादन श्रेणींना ट्रम्प यांनी टॅरिफ आकारणीतून सूट दिली आहे. त्याच वेळी, ४ टक्के निर्यात (प्रामुख्याने ऑटो पार्ट्स) वर २५ टक्के कर आकारला जाईल. जास्त कर आकारल्याने अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादने महाग होतील. उल्लेखनीय म्हणजे, भारताची इतर प्रमुख व्यापारी भागीदार, चीन, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यासोबत मोठी व्यापार तूट आहे.

कापड, रत्ने आणि दागिने क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात

ट्रॅम्प यांनी लादलेल्या या टॅरिफचे परिणाम व्यापक असू शकतात, कारण भारताच्या निर्यातीत अमेरिकेचा वाटा २० टक्के आणि एकूण जीडीपीत २ टक्के आहे. कमी कुशल कामगारांसाठी हे एक मोठे आव्हान असेल. हे लक्षात घेता, कापड, रत्ने आणि दागिने या क्षेत्रांनी नोकऱ्या गमावण्याच्या भीतीमुळे कोविड-१९ कालावधीप्रमाणे मदत मागितली आहे. या क्षेत्रांमधून होणारी सुमारे ३० टक्के निर्यात केवळ अमेरिकन बाजारपेठेत जाते.