scorecardresearch

Premium

Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरुन बचत होऊ शकते?

आपलं क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरल्यास आपण, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या खरेदीवर, उत्तम बचत करू शकतो.

using credit cards save money
क्रेडिट कार्ड वापरुन बचत होऊ शकते? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘क्रेडिट कार्ड हे बचतीचं उत्तम साधन आहे!’ हे वाक्य वाचल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल. ते एक प्रकारे स्वाभाविक सुद्धा आहे कारण आपल्या पैकी अनेकांचा क्रेडिट कार्डबाबतचा अनुभव फारसा आनंददायक नसतो.

आपल्यापैकी बहुतेक सर्व जण क्रेडिट कार्ड्स वापरतात. बरेचजण एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स सुद्धा वापरतात . क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीचं पेमेंट योग्य वेळी न केल्यानं बऱ्याच लोकांना खरेदी केलेल्या वस्तूच्या कितीतरी पट अधिक रक्कम क्रेडिट कार्ड बँकेला दयावी लागते. त्यापैकी बहुसंख्य लोकांना आपण किती अधिक रक्कम याची सुद्धा पुरेशी कल्पना नसते. क्रेडिट कार्डाचं देणं जर आपण योग्य मुदतीत दिलं नाही तर त्या देण्याची रक्कम भरमसाठ वेगाने वाढत जाते. वाढलेली रक्कम भरणं सामान्य माणसाला अवघड किंवा कधीकधी अशक्य होतं. मग क्रेडिट कार्ड देणारी बँक किंवा संस्था त्या लोकांचं क्रेडिट कार्ड जप्त करते. त्यानंतर त्यांच्याकडून येणं असलेले आपले पैसे बऱ्या-वाईट मार्गाने वसूल करते. पण या सर्व समस्या या ‘क्रेडिट कार्ड’मुळे आलेल्या नसतात तर आपल्याला ‘क्रेडिट कार्ड’ या साधनाचा योग्य वापर न करता आल्यामुळे निर्माण झालेल्या असतात. म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःच त्या निर्माण केलेल्या असतात. या उलट, आपलं क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरल्यास आपण, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या खरेदीवर, उत्तम बचत करू शकतो. त्याचबरोबर आपली खरेदी आनंददायक , सोयीस्कर आणि किफायतशीर करु शकतो.

BEL Recruitment 2023
‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती
Doctor Micky Mehta Jumping Jack Routine For You To Loose Inches and Kilos Perfect Lazy Day Workout Routine You Should DO
Weight Loss: जंपिंग जॅक ठरेल वजन कमी करायची सोपी हॅक! डॉ. मेहतांकडून जाणून घ्या फायदे व प्रभावी पद्धत
Cochin Shipyard Recruitment 2023
M.Com आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! CSL अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांसाठी भरती सुरु
credit card use
Money Mantra: क्रेडिट कार्डने खरेदी करताय ? हे वाचायलाच पाहिजे..

आपल्या खरेदीच्या कित्येक पट रक्कम क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेला किंवा कंपनीला देण्याचं टाळून आपली खरेदी आनंददायक आणि किफायतशीर करण्यासाठी काही बाबींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

सुयोग्य क्रेडिट कार्ड ची निवड करावी

क्रेडिट घेण्यापूर्वी आपण प्रामुख्याने कोणत्या वस्तूंची खरेदी करतो, आपण प्रामुख्याने कोणत्या वेळी खरेदी करतो, आपण कोणत्या ठिकाणी नियमितपणे खर्च करतो याचा सर्वांगीण विचार करावा. जर आपण किराणा आणि गृहोपयोगी वस्तूंची खरेदी अधिक प्रमाणात करत असू तर ‘बिग बास्केट ‘ किंवा ‘रिलायन्स रिटेल ‘ यासारख्या गृहोपयोगी वस्तू पुरवणाऱ्या कंपन्यांशी संलग्न असलेले क्रेडिट कार्ड निवडावं. अशा प्रकारचं क्रेडिट कार्ड गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सवलती देतं. अशा प्रकारच्या सवलती सतत मिळत राहिल्यानं गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर आपली मोठी बचत होऊ शकते.

जर आपण एखाद्या विशिष्ट वेळी म्हणजे दिवाळी किंवा अन्य सणासुदीला खरेदी करत असू तर अशा सणासुदीला खरेदीवर विशेष सवलती देणारी दुकानं किंवा मॉल्स यांच्याशी संलग्न असलेलं क्रेडिट कार्ड निवडावं. यामुळे ती दुकानं देत असलेल्या सवलती आपल्याला मिळतातच पण त्याच बरोबर क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्स आणि इतर ‘बोनस’ मोठ्या प्रमाणात मिळतात. आजकाल अनेक पंचतारांकित हॉटेल्स, एखाद्या बँकेच्या सहकार्याने, स्वतःची क्रेडिट कार्ड्स तयार करुन ती आपल्या ग्राहकांना देतात. त्यांच्या क्रेडिट कार्ड्सवर ती हॉटेल्स मोठे डिस्काउंट आणि अन्य अनेक सुविधा देतात. आपण अशा हॉटेलमध्ये नियमित जात असू , प्रवासाला गेल्यावर त्याच शृंखलेच्या हॉटेलमध्ये उतरत असू तर ही क्रेडिट कार्ड्स अतिशय उपयोगी ठरतात. परंतु आपण अशा हॉटेलमध्ये क्वचित कधीतरी जात असू तर त्या क्रेडिट कार्डचा आपल्याला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी आपल्या खरेदीच्या पद्धतीचा आढावा घेऊन त्याला पूरक अशा प्रकारचं क्रेडिट कार्ड निवडावं.

क्रेडिट कार्ड वापरून नियमितपणे खरेदी करावी

आपल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून नियमित आणि शक्य तितकी जास्त खरेदी करावी. जास्त खरेदी केल्यामुळे अधिक रिवॉइड पॉईंट्स मिळतात. या पॉईंटचा उपयोग आपण क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेकडून भेटी किंवा काही वस्तूंच्या ख्ररेदीवर मोठे डिस्काऊंट्स मिळवण्यासाठी करू शकतो. क्रेडिट कार्ड सेवा देणारी कंपनी जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपल्या ‘खास’ ग्राहकांच्या यादीमध्ये समाविष्ट करू घेते. या खास ग्राहकांना क्रेडिट कार्ड च्या इतर सामान्य ग्राहकांना न मिळणाऱ्या अनेक सवलती आणि सुविधा दिल्या जातात. बऱ्याचशा क्रेडिट कार्ड कंपन्या, महिन्याला एका विशिष्ट रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, अधिक ‘कॅश बॅक’ देतात , म्हणजे ग्राहकांनी खर्च केलेल्या रकमेमधले पैसे त्याना अधिक प्रमाणात परत करतात. जास्त खरेदी करणाऱ्या आणि क्रेडिट कार्डचं देणं वेळेत चुकतं करणाऱ्या ग्राहकांना कंपनी क्रेडिट कार्डच्या वार्षिक शुल्कामध्ये सवलत देते किंवा बऱ्याच वेळा, ते शुल्क पूर्णपणे रद्द सुद्धा करते. या सर्वांमुळे आपली खरेदी अतिशय किफायतशीर होते. मात्र खरेदी करताना, खर्च केलेली रक्कम आपण मुदतीत पूर्ण करू शकू याचं भान ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

क्रेडिट कार्ड धारकांना मिळणाऱ्या डिस्काउंट सेल आणि तत्सम इतर सुविधांकडे नियमित लक्ष ठेवावं

क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्या ग्राहकांना खरेदीच्या अनेक ऑफर्स देत असतात. अशा ऑफर्स मध्ये उत्तम डिस्काउंट दिला जातो पण ती ऑफर मर्यादित काळासाठी असते. अशा ऑफर्समध्ये केलेली खरेदी अत्यंत किफायतशीर ठरते. ‘शॉपर्स स्टॉप’ ही डिपार्टमेंटल स्टोअर्सची शृंखला तीन दिवसांचा सेल जाहीर करते. यापैकी पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी फक्त शॉपर्स स्टॉपशी संलग्न असणाऱ्या क्रेडिट कार्ड धारकांनाच प्रवेश दिला जातो. कित्येक वर्षांपूर्वी मी त्या दिवशी पहिल्यांदा, त्या सेलमध्ये खरेदीसाठी गेलो. तिथे अत्यंत उत्तम ब्रँड्सचे कपडे आणि वस्तू, त्यांच्या मूळ किमतीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी किमतीत उपलब्ध होत्या. ती खरेदी अतिशय किफायतशीर ठरली. त्यानंतर मी प्रत्येक वर्षी मी नियमितपणे त्या दिवशी खरेदी साठी ‘शॉपर्स स्टॉप’ मध्ये जातो. आता ऑनलाईन खरेदीची सुविधा लोकप्रिय झाल्यानंतर अशा अनेक किफायतशीर ऑफर्स सातत्याने येत असतात. त्यावर लक्ष ठेऊन त्यांचा लाभ घेतल्यास आपण आपल्या खरेदीवर मोठी बचत करू शकतो.

क्रेडिट कार्डच्या देण्याची संपूर्ण रक्कम काटेकोरपणे योग्य मुदतीत चुकतं करावी

आपल्या क्रेडिट कार्ड व्यवहारातून ‘बचत’ साध्य करायची असेल तर क्रेडिट कार्डच्या मासिक देण्याची संपूर्ण रक्कम योग्य त्या मुदतीत चुकती करणं अनिवार्य आहे. सर्वच क्रेडिट कार्ड कंपन्या आपण त्यांना देणं असलेली संपूर्ण रक्कम चुकती करण्याचा आग्रह धरत नाहीत तर त्या ऐवजी त्या एक ‘किमान’ रक्कम भरण्याची सुविधा आपल्याला देतात. ती किमान रक्कम संपूर्ण रकमेच्या तुलनेत फारच कमी असते. परंतु किमान रक्कम भरण्याची सुविधा ही एक फसवी सुविधा आहे कारण किमान रक्कम भरल्या नंतर जी रक्कम उरते त्यावर कंपनी व्याज आकारते . तसंच पूर्ण रक्कम न भरल्याबद्दल दंड ठोठावून दंड स्वरूपात अन्य काही रक्कम सुद्धा वसूल करते. हे व्याज आणि दंड प्रतिमहिना वाढत जातो.

काहीकाळ सलग फक्त राहिलं आपलं क्रेडिट कार्डचं देणं मूळ देण्याच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं. बऱ्याच वेळा ती रक्कम भरण ग्राहकाला अतिशय कठीण किंवा अशक्य होतं. त्याच बरोबर, पूर्ण रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड कंपनी ‘काळ्या यादीत’ टाकते. या काळ्या यादीतील ग्राहकांना खरेदीवर मिळण्याऱ्या सवलती दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्या ग्राहकांची क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर बचत करण्याची संधी कमी किंवा जवळपास नाहीशी होते. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डच्या देण्याची संपूर्ण रक्कम योग्य त्या मुदतीत चुकती करणं ही अत्यंत गंभीरपणे घेऊन ती काटेकोरपणे अंमलात आणणं अत्यावश्यक आहे.

क्रेडिट कार्ड धारकांना मिळू शकणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधांचा लाभ घ्यावा

आपल्या प्रत्येक खरेदीवर क्रेडिट कार्ड कडून आपल्याला ‘कॅश बॅक’ योजनेमधून लहानशी का होईना पण काही रक्कम मिळेल, जास्तीतजास्त ‘रिवॉर्ड पॉईंट्स ‘ मिळतील या प्रकारे आपल्या खरेदीचं नियोजन करावं. मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचा विनियोग उपयुक्त भेटी मिळवण्यासाठी अथवा आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी करावा.

क्रेडिट कार्ड वापराचे अनेक फायदे आहेत. पण त्याचबरोबर, क्रेडिट कार्ड कंपनी देत असलेली प्रत्येक ऑफर आणि सुविधा ही आपल्याला खरेदी करायला उद्युक्त करणारं प्रलोभन असतं; ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आपण क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केली आणि क्रेडिट कार्डच देणं चुकवू शकलो नाही तर क्रेडिट कार्ड कंपनी त्या रकमेवर भरमसाठ व्याज आकारत जाते. ते व्याज हा क्रेडिट कार्ड कंपनीचा फायदा असतो. त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे. 

खर्च करण्याची आपली मर्यादा किती आहे हे आपण ओळखलं पाहिजे. ‘क्रेडिट कार्ड’ कंपनी दाखवत असलेल्या प्रलोभनांना बळी न पडता आपण आपल्या मर्यादेत राहून खर्च केला आणि क्रेडिट कार्डचं संपूर्ण बिल योग्य मुदतीत काटेकोर पणे चुकवलं तर कंपनी आपल्याकडून फायदा कमावण्याऐवजी उलट, आपण कंपनीकडून लाभ मिळवू शकतो.

कमाई दहा रुपये वजा खर्च बारा रुपये = दुःखी आयुष्य

कमाई दहा रुपये वजा खर्च आठ रुपये = आनंदी आयुष्य 

ही आयुष्याची सोपी समीकरणं आहेत. क्रेडिट कार्ड वापरताना ती लक्षात ठेवावीत. त्यामुळे खरेदी करताना सुद्धा आपण बचत करू शकू आणि खरेदीचा व आयुष्याचा खरा आनंद उपभोगू शकू!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: By using credit cards properly anyone can save money mmdc dvr

First published on: 02-10-2023 at 17:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×