‘कर्त्या’ म्युच्युअल फंडांच्या त्रैमासिक आढाव्यात शिफारसप्राप्त फंडाच्या यादीत निप्पॉन इंडिया लार्जकॅप, निप्पॉन इंडिया मल्टीकॅप, निप्पॉन इंडिया फ्लेक्झीकॅप, निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप या फंडांचा समावेश केला. या आढाव्या दरम्यान निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शैलेश राजभान यांच्याशी चर्चा केली. या संभाषणाचा हा संपादित अंश…

भारतीय आणि जागतिक भांडवली बाजारांच्या वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल?

– अन्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय भांडवली बाजाराने घसरणीनंतर लवकर उसळी मारल्याचे दिसून आले आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता शिगेला पोहोचली असताना भारतीय बाजारातील अस्थिरता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत व्याजदर वाढविल्याने उदयोन्मुख बाजारातून परकीय वित्तसंस्थांनी भांडवल काढून घेतल्याचे दिसून आले आहे. जगभरात आगामी काळात महागाई आणि अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर दोन्ही मंदावण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा आहे. लवकरच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय होण्याची आशा आहे.

हेही वाचा – माझा पोर्टफोलिओ : प्रतिष्ठित प्रवर्तक आणि भविष्यातील ‘मार्केट लीडर’

मॉर्निंगस्टार असो किंवा क्रिसिल असो, म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थांनी निप्पॉन इंडियाच्या वेगवेगळ्या फंडांना चांगली पत बहाल केली आहे. आपले फंड चांगली कामगिरी करीत आहेत आणि गुंतवणूकदार तुमच्या फंडाची निवड करीत आहेत हे पाहून तुमच्या नेमक्या भावना काय आहेत?

– आमच्या प्रवर्तकांमध्ये पाच वर्षांपूर्वी बदल झाला. तेव्हापासून आमच्या गुंतवणूक पद्धतीत मोठे बदल झाले. आमचे जोखीम व्यवस्थापन (रिस्क फ्रेमवर्क) अधिक कठोर करण्यात आले, त्याचे फळ फंड घराण्याला मिळते आहे. मागील आर्थिक वर्ष सुरू झाले तेव्हा, आम्ही मालमत्ता क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर होतो. वर्ष संपताना आम्ही चौथ्या क्रमांकावर आलो आहोत. मागील आर्थिक वर्षात आमच्या फंड घराण्याची सरासरी मालमत्ता (एयूएम) २,९४,५०० कोटी होती. या मालमत्तेत वैयक्तिक गुंतवणूकदारांचा जवळजवळ ५० टक्के वाटा आहे. मागील वर्षात आमच्या सक्रिय फोलिओंची संख्या ११ कोटी ६४ लाख असून फोलिओंच्या संख्येने १३ टक्के वाढ नोंदविली आहे. इतक्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार आमच्यावर विश्वास ठेवत आहेत. ही आनंदाची बाब असली तरी, आमच्यावर गुंतवणूकदारांनी टाकलेल्या जबाबदारीची आम्हाला जाणीव असून आम्ही आमच्या प्रयत्नांची शिकस्त करू. ३१ मार्च २०२३ रोजी एकूण मालमत्तेमध्ये ५० टक्के मालमत्ता किरकोळ गुंतवणूकदारांची होती. हे लक्षात घेता आम्ही समाधानी असलो तरी आमच्या गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापनाचे हे फळ आहे असे मानतो.

तुमच्या पोर्टफोलिओत असलेल्या कंपन्यांच्या उत्सर्जनाबाबत तुम्ही काय अपेक्षा करीत आहात?

– दोन तिमाहींपासून अपवाद वगळता कंपन्यांच्या उत्सर्जनात कमकुवतपणा आलेला दिसत आहे. त्याहूनही त्रासदायक बाब म्हणजे ती सर्वच क्षेत्रात विशेष लक्षवेधी संधी उपलब्ध असल्याचे अभावाने दिसते. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील वृद्धी तफावत वाढल्याचे दिसत आहे. जसे की, जिन्नस आणि निर्यात केंद्रित क्षेत्रातील महसूल म्हणजेच कापड, रत्ने आणि दागिने आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांमध्ये वार्षिक घट झाल्याचे दिसते आहे. पोलाद उत्पादनाचा महसूल, वाढला तरी मे २०२२ मधील निर्यात शुल्क लादल्यामुळे आणि उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्याने तसेच कमकुवत जागतिक मागणीमुळे पोलाद कंपन्यांच्या नफ्यात घट होईल. जागतिक मागणीच्या अभावी अ‍ॅल्युमिनियम उद्योगाच्या महसुलात १८ ते २० टक्के घट होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.

जागतिक मागणी स्थिरावण्याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे?

– जागतिक मागणी स्थिरावण्यास आणखी २ ते ३ तिमाही वाट पाहावी लागेल. परंतु देशांतर्गत मागणीत अनुकूल पर्जन्यमान झाल्यास त्याआधी सुधारणा होऊ शकते.

तुम्ही तुमचे पैसे कोठे गुंतवण्यास प्राधान्य द्याल? उपभोगाच्या वस्तू किंवा भांडवली वस्तूंमध्ये?

– मार्च एप्रिल महिन्यात ज्याप्रकारे कंपन्यांचे मूल्यमापन बदलले, ते पाहता उत्पादक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उच्च विकास दर असूनही त्यांना उच्च मूल्यांकन वाजवी आहे असे वाटते. दुसरीकडे, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्याच्या चांगल्या संधी नव्याने दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांकडे तुम्ही कसे पाहता?- ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांना महागाईची झळ लागलेली दिसते आहे. त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांची नफाक्षमता कमी झाली आहे. विवेकी ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांना महागाईची कमी झळ लागली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढ पाहता, मिडकॅप ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत गुंतवणुकीची संधी दिसत आहे.

तुम्ही आरोग्य सेवा क्षेत्राबद्दल काय सांगू शकाल ?

– मागणीच्या दृष्टिकोनातून मला वाटते की, आरोग्य सेवा क्षेत्रात मागणी सामान्य होत असल्याचे दिसत आहे. तुम्ही जेव्हा व्यवसायांच्या दीर्घायुष्याचा आणि उत्पादन क्षमतावाढीचा विचार करता तेव्हा हा सर्वात स्वस्त व्यवसायांपैकी आणि क्षमता वाढीची संधी उपलब्ध असणारा एक व्यवसाय आहे. त्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्र निश्चितपणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी मानली जाऊ शकते.

हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा: पेन्शन पोर्टफोलिओ बांधताना…

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राबद्दल तुमचे मत काय आहे?

– आयटी क्षेत्रात महसुलात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे, जी आजपर्यंत प्रत्यक्षात आलेली नाही. अमेरिकेतील व्याजदर वाढीचा या क्षेत्रावर कसा परिणाम होतो यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे वित्तीय सेवा क्षेत्राचे सर्वात मोठे आव्हान आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईसमधील संकटामुळे भारतीय आयटी क्षेत्रासाठीही बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि विमा (बीएसएसआय) क्षेत्र हे भारतीय आयटी उद्योगासाठी सर्वात मोठे महसूल देणारे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावरील कोणत्याही नकारात्मक वृत्ताचे आयटी क्षेत्रावर निश्चितच परिणाम होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(shreeyachebaba@gmail.com)