Market Week Ahead: निफ्टी निर्देशांकाने २५,००० च्या पातळीला भोज्या केला आणि शुक्रवारच्या घसऱणीतही ती पातळी टिकवून ठेवली. फार काळ ताणले न जाता, पाकिस्तानशी थेट चर्चेअंती झालेली शस्त्रबंदी आणि सीमेवरील लष्करी कारवायाही टिकाऊ स्वरूपात बंद होणे ही शेअर बाजाराला सर्वाधिक मोहवणारी गोष्ट ठरली. अमेरिकेतील ट्रम्पप्रणीत ‘टॅरिफ’चा ताणही सैलावत आहे आणि चीन-अमेरिका व्यापार युद्धाला मिळालेला तूर्त विराम या सकारात्मक गोष्टीतून अलिकडच्या इतिहासातील सेन्सेक्स-निफ्टीचे सर्वोत्तम झेप घेणारे सत्रही आपण पाहिले. एकंदरीत तेजीचे आनंददायी भरते अनुभवत असताना, आगामी १९ मे ते २४ मे या आठवड्यात बाजाराचा कल कसा असेल, हे पाहूया.

सरलेल्या आठवड्यावर दृष्टिक्षेपः
० सेन्सेक्स – ८२,३३०.५९          साप्ताहिक वाढ + २,८७६.१२ (३.६१%)
० निफ्टी   – २५,०१९.८०          साप्ताहिक वाढ + १,०११.८० (४.२१%)
० रुपया  – ८५.७५ / डॉलर         साप्ताहिक घसरण २१ पैसे
० सोने – ९६,४५० रु./ १० ग्रॅम      साप्ताहिक घसरण ३,२८० रुपये
० खनिज तेल – ६४.६२ डॉलर/ पिंप  साप्ताहिक वाढ १.१४%

बाजार तेजीच्या रसात पुरता मुरला आहे, हे स्पष्टच आहे. ७ एप्रिलला अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात कराच्या घोषणेच्या धसका घेऊन निफ्टी निर्देशांकाने मोठी घसरण दर्शविली होती. पण त्या तळच्या पातळीपासून अल्पावधीत तब्बल ३,२०० अंशांची उसळी देखील या निर्देशांकाने घेतली आहे. ही त्याची कल बदल दर्शविणारीच मुसंडी आहे. त्यामागील ठणका आणि आवेश पाहता तो इतक्यात विरून जाणे अशक्यच. त्यामुळे अधूनमधून पारा काहीसा वर-खाली होत राहिल, परंतु निफ्टी निर्देशांक जोवर २४,००० अंशांच्या पातळीवर टिकून आहे, तो पर्यंत भविष्याविषयी काळजीचे कारण नाही, असा बहुतांश तांत्रिक-विश्लेषकांचा होरा आहे. गुंतवणूकदारांनी पाळत ठेवायची २४,००० ची पातळी ही तब्बल हजार अंशांनी खाली आहे, हेही ध्यानात असू द्यावे.

आगामी १९ मे ते २४ मे आठवड्यातील पाच लक्षणीय घडामोडीः

० अमेरिकेची पत-झडः

जगातील सर्वात मोठ्या अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेचे पतमानांकन जवळपास शतकभरानंतर, सर्वोच्च अशा ट्रिपल ए मानांकनावरून, पहिल्यांदाच खाली घसरले आहे. मूडीजने १९१९ मध्ये दिलेले हे पतमानांकन आता घटवून ‘एए१’ असे खाली आणले आहे. तब्बल ३६ ट्रिलियन डॉलरच्या कर्जाचा डोंगर आणि या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी होणारा मोठा खर्च हा अमेरिकी अर्थव्यवस्थेचाच घास घेत चालला आहे, असे या पतमानांकन संस्थेचे म्हणणे आहे. ट्रम्प प्रशासनाची नापसंती ओढवून घेणाऱ्या शनिवारी आलेल्या या निर्णयाचे शेअर बाजारात सोमवारी नकारात्मक पडसाद दिसून येतील. एकूण अमेरिकेतील मंदीच्या भीतीला गडद करणाऱ्या घडामोडीचे स्थानिक बाजारातही प्रतिबिंब उमटलेले दिसणे स्वाभाविकच.

० परकीय गुंतवणूक संस्थांची निरंतर खरेदीः

भारतीय शेअर बाजारातील ताजा कल बदल हा प्रामुख्याने परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) सुरू असलेल्या निरंतर खरेदीपायीच आहे. सरलेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात ४,४५२ कोटी रुपये गुंतवले, मे महिन्यात आतापर्यंत त्यांची निव्वळ गुंतवणूक १८,६२० कोटी रुपये राहिल्याचे ‘एनएसडीएल’ने संकलित केलेली आकडेवारी दर्शविते. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, एफआयआयचे शेअर्स खरेदीची आक्रमक पावले ही बाजारातील दिग्गजांसाठी देखील आश्चर्याचा धक्का ठरली आहेत. जर त्यांनी त्यांच्या ‘बाय इंडिया’ धोरणाचा अवलंब असाच सुरू ठेवला तर बाजार आणखी आश्चर्यचकित शिखरांना गाठताना दिसू शकतो. परंतु पुन्हा मूल्यांकन वाढल्याच्या चिंताही डोके वर काढेल, असे ते म्हणाले.

० भारताच्या निर्मिती व सेवा क्षेत्राची कामगिरी

देशातील खासगी क्षेत्रातील निर्मिती (उत्पादन) आणि सेवा उद्योगाच्या कामगिरीला एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आणि सर्व्हिसेस पीएमआय या दोन्ही महत्त्वाच्या आकडेवारीं चा येत्या गुरुवारी (२२ मे) उलगडा होईल. निर्मिती क्षेत्राचा पीएमआय मार्चमधील ५८.१ वरून एप्रिलमध्ये ५८.२ पर्यंत वाढला. जो दहा महिन्यांतील या क्षेत्रातील सर्वात मजबूत सुधारणा दर्शविणारा आहे. आता मे महिन्याच्या आकड्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय एप्रिल २०२५ मध्ये ५८.७ पर्यंत घसरला. त्यामुळे मे महिन्याचे त्याचे जाहीर होणारे आकडे विस्तारदर्शक असतील काय, याबद्दल उत्सुकता आहे.

० अमेरिकेतील रोजगार स्थितीः

अमेरिकेतील प्रारंभिक बेरोजगारीचे दाव्यांचे आकडे येत्या गुरुवारी जाहीर होतील. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात तेथील प्रारंभिक बेरोजगारीचे दावे १३ हजारांनी घसरून २२८,००० वर आले, जे बाजारातील २३०,००० च्या अपेक्षेपेक्षा थोडे कमी होते. अर्थात बेरोजगारीच्या दाव्यांचे प्रमाण घटणे हे तेथे रोजगाराचे प्रमाण वाढत असल्याचेही शुभसूचक द्योतक आहे, १० मे रोजी संपलेल्या आठवड्याचे आकडे येत्या गुरुवारी सायंकाळी जाहीर केले जातील.अर्थात हे आणि महागाई दराच्या आकडे अनुकूल ठरले तर अमेरिकेत व्याजदर कपातीबाबत आशावाद टिकून राहिल, हे लक्षात घेतले जावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

० कंपन्यांची तिमाही कामगिरी

आर्थिक वर्षाच्या चौथ्या (जानेवारी ते मार्च २०२५) तिमाहीच्या निकालांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, आगामी आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी गुंतवणूकदारांकडून बारकाईने तपासली जाईल. या कंपन्यां अशा-
० सोमवार, १९ मेः भारत इलेक्ट्रॉनिक्स, करूर वैश्य बँक, पेट्रोनेट एलएनजी, झायडस वेलनेस.
० मंगळवार (२० मे): फोर्टिस हेल्थ, हिंडाल्को, युनायटेड स्पिरिट्स, झायडस लाईफ
० बुधवार (२१ मे): कोलगेट पामोलिव्ह, मॅनकाइंड फार्मा, नाल्को, ओएनजीसी, रेल विकास, व्हीआरएल लॉजिस्टिक्स
० गुरुवार (२२ मे): गुजरात स्टेट पेट्रो, ग्रासिम, आयटीसी, सन फार्मा, टीव्ही टुडे नेटवर्क
० शुक्रवार (२३ मे): अशोक लेलँड, ग्लेनमार्क, जेएसडब्ल्यू स्टील
निकाल अपेक्षेनुरूप नसले तर त्याचे बाजारात खूपच तिखट प्रतिसाद उमटतात. त्या उलट चांगल्या निकालांचे बाजारात स्वागतही होत असते, जे अलिकडे अनेक उदाहरणांत दिसलेही आहे.